Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा संतोष देशमुखांच्या लेकीला फोन; बारावी उत्तीर्ण केल्याबद्दल अभिनंदन करत वैभवीला दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
Vaibhavi Deshmukh HSC Result: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही संतोष देशमुखांच्या लेकीला फोन करत बारावी परीक्षा अतिशय चांगले गुण मिळवत उत्तीर्ण केल्याबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात.

Vaibhavi Deshmukh HSC Result: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची अपहरण करून अतिशय क्रूर आणि निर्घृणपद्धतीने हत्या करण्यात आली होती. 9 डिसेंबर 2024 रोजीच्या घटनेने संपूर्ण राज्य अन् देश हादरला होता. या हत्येच्या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आणि सर्व स्थरातून आरोपीला काठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरले. दरम्यानच्या काळात देशमुख कुटुंबियांना मोठ्या कठीण प्रसंगाला समोर जावं लागलं. अशातच संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखचे (Vaibhavi Deshmukh) हे बारावीचे वर्ष होतं. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैभवीनं या कठीण प्रसंगीही चांगला अभ्यास करत बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. काल (5 मे) बारावीचा निकाल लागला. ज्यात वैभवीने 85.33% टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. त्यानंतर राज्यभरातून वैभवीवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यात प्रामुख्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही (Devendra Fadnavis) संतोष देशमुखांच्या लेकीला फोन करत बारावी परीक्षा अतिशय चांगले गुण मिळवत उत्तीर्ण केल्याबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात.
पुढं जे शिक्षण घ्यायचं ते घे, आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत- देवेंद्र फडणवीस
कठीण परिस्थितीत वैभवीने चांगले गुण मिळवत परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवीला पुढं जे शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण घे, आम्ही तुझ्या पाठीशी कायम आहोत, असे आश्वासन दिले. तसेच दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देखील मिळेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुखला पत्र सुद्धा लिहिले आहे. त्यात बारावीच्या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. अंबेजोगाईचे SDO दीपक वाजळे यांनी प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्र्यांचे हे पत्र वैभवी देशमुखला दिलं आहे.
आज कौतुकाची थाप टाकण्यासाठी माझे वडील नाहीत- वैभवी देशमुख
वडील सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनाने देशमुख कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना वैभवीने 12 वीची परीक्षा दिली होती. दरम्यान, निकालाच्या सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेत त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे तिने म्हटले. त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच येईल, असा मला विश्वास आहे. तर आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत, याचं मला दुःख आहे, अशी खंत तिने व्यक्त केली होती. माझ्या वडिलांचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला होता, त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच एक आरोपी अद्यापही फरार आहे, त्याला देखील अटक केली जावे, अशी मागणी वैभवी देशमुख हिने यावेळी केली.
हे ही वाचा
























