निकाल लागला पण कौतुकाची थाप द्यायला वडील नाहीत; वैभवी जिद्दीने म्हणाली, वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार
HSC Exam Result 2025: आज बारावीचा निकाल लागला मला 85.33% गुण मिळाले आहेत. परंतु, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत.

बीड : वडिलांचा खून, न्यायासाठी गावोगावी मोर्चे, आंदोलन, पोलीस अन् लोकप्रतिनिधींचे दौरे, गावातील घरासमोर दररोज भेटायला आलेली माणसं ह्या सगळ्या गदारोळात आणि दु:खद प्रसंगातही दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांच्या कन्येनं बाजी मारली. इयत्ता 12 वीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवत पुढील स्वप्नांची वाट धरली आहे. राज्यात 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये, यंदाचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला. यंदा बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. बारावीच्या (HSC) निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.51 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.07 टक्क्यांनी अधिक आहेत. याच मुलींमध्ये बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख (vaibhavi deshmukh) हिनेही 85.33 टक्के गुण मिळवत यश प्राप्त केलं.
आज बारावीचा निकाल लागला मला 85.33% गुण मिळाले आहेत. परंतु, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत, अशा शब्दात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने आपल्या वडिलांची आठवण जागवली. 12 वीच्या निकालानंतर वैभवीचे महाराष्ट्र भरातून कौतुक होत आहे. मात्र, आज तिचं कौतुक करायला तिचे वडील तिच्यासोबत नाहीत याचं मोठं दुःख वैभवीला आहे. वैभवीच्या डोळ्यातील अश्रू तिच्या आनंदी क्षणात अनेकांचे डोळे पाणावणारे ठरत आहेत. माझी NEET परीक्षेची देखील तयारी सुरू आहे. परंतु, काल झालेला नीटचा पेपर मला अवघड गेलेला आहे, त्याच्यात स्कोरिंग कमी येत आहे. पण, मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे, अशी जिद्द देखील तिने बोलून दाखवली.
दरम्यान, वडिलांच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर असताना वैभवीने 12 वीची परीक्षा दिली होती. आज सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे तिने म्हटले. त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच येईल असा मला विश्वास आहे. तर आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत याचं मला दुःख आहे, अशी खंत तिने व्यक्त केली होती.
वडिलांच्या खुनातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी
माझ्या वडिलांचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला होता, त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच एक आरोपी अद्यापही फरार आहे, त्याला देखील अटक केली जावे, अशी मागणी वैभवी देशमुख हिने यावेळी केली.
वैभवीचे गुणपत्रक
वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. संतोष देशमुख यांच्या मुलीला इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. तिला एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत.























