मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमधून सुटणाऱ्या एसटी बसेस रद्द
Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य बस स्थानकातून कन्नड, पैठण, बीड आणि जालना येथे जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू असून, काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत नांदेड आणि बीड जिल्ह्यातील एसटी बसवर (ST Bus) दगडफेक करण्यात आली, तर काही ठिकाणी बस पेटवून देण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील मुख्य बस स्थानकातून काही बस रद्द करण्यात आल्या आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य बस स्थानकातून कन्नड, पैठण, बीड आणि जालना येथे जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहे. तर, सिल्लोड आणि पुणे या महामार्गावरील बसेस सध्या सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच सर्व मार्गावरील स्थानिक पोलिसांशी आम्ही संपर्क करत असून, त्यांच्या सूचनेनुसार बस सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देखील एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पैठण डीपोत बस उभ्या...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याने छत्रपती संभाजीनगर ते पैठण मार्गावरील बसेस सध्या बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे पैठण डेपोमध्ये सध्या सर्व बसेस जागेवर उभा आहेत. पैठण डेपोतून निघणाऱ्या सर्व बसेस पुढील आदेश येईपर्यंत बाहेर काढू नयेत अशा सूचना देखील एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीड-नांदेडमध्ये बसवर दगडफेक...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक होतांना पाहायला मिळत असून, बीड आणि नांदेडमध्ये आज बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. बीडहून कल्याणकडे जाणारी एसटी बस चराटा फाट्याजवळ आली असता, यावेळी आंदोलकांनी प्रवाशांना खाली उतरवून या बसवर तुफान दगडफेक केली. यामध्ये बसच्या संपूर्ण काचा फुटल्या आहेत. तर दुसऱ्या घटनेत नांदेडच्या माहूर तालुक्यातील आष्टा फाटा इथे अज्ञात मंडळीने एसटी बसेसवर दगडफेक केलीय. यात एसटी बसेसच्या काचा फुटून नुकसान झालंय. या प्रकरणी पोलीस दगडफेक करणाऱ्या लोकांचा शोध घेतायत. मराठवाड्यातील या घटना पाहता एसटी महामंडळाकडून खबरदारी म्हणून एसटी बसेस रद्द करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. तसेच पुढील परिस्थिती लक्षात घेऊन बस सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, याच फटका प्रवाशांना बसतांना पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: