निकाल आमच्याच बाजूने, ठाकरे गटाचे आमदारही शिंदे गटात येतील; संदिपान भुमरेंना विश्वास
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येण्यासाठी फक्त आता काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यापूर्वी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येतांना पाहायला मिळत आहे.
Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे. तसेच, ठाकरे गटाच्या विरोधात हा निकाल लागल्यावर त्यांचे आमदार देखील आमच्याकडे येतील असा विश्वास शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येण्यासाठी फक्त आता काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यापूर्वी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येतांना पाहायला मिळत आहे. तर, यावरच शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. "निकाल शंभर टक्के आमच्या बाजूने लागेल. हा आम्हाला आत्मविश्वास. जर, निकाल विरोधात गेला तर तो मान्य करू आणि संघटनेचे काम करत राहणार. तसेच, निकाल ठाकरे गटाच्या विरोधात गेला, तर त्यांचे आमदार आमच्या गटात प्रवेश करतील असा संदिपान भुमरे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
अपात्रता प्रकरणाच्या निकालाकडे महाराष्ट्रसह देशाचे लक्ष
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या म्हणजेच 10 जानेवारी रोजी निकाल देणार आहेत. या निकालाकडे महाराष्ट्रसह देशाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे या निकालाआधीच शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये टीकेचे बाण सोडले जाऊ लागले आहेत. तर, निकाल आमच्याच बाजूने लागणार असल्याचे दोन्ही गटाच्या नेत्यांकडून ठासून सांगितले जात आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांचा निकाल काय असणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
संदिपान भुमरे यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार...
शिंदे गटाचे एकूण 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहेत. ज्यात संदिपान भुमरे यांचा देखील समावेश आहे. भुमरे शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण विधानसभा मतदारसंघाचे ते नेतृत्व करतात. त्यामुळे उद्याच्या निकालाबाबत भुमरे समर्थकांचे देखील लक्ष लागले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
राजकारणात एका रात्रीत बदल घडतात, शिंदे गटाच्या खासदारांचे सूचक वक्तव्य