मोठी बातमी! अतिक्रमण काढण्यासाठी आलेला महापालिकेचा जेसीबी पेटवून दिले; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेच्या जेसीबीवर आधी दगडफेक आणि त्यानंतर जेसीबी पेटवून देण्यात आले आहे. ज्यात जेसीबी पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, अतिक्रमण काढण्यासाठी आलेला महापालिकेचा जेसीबी पेटवून देण्यात आला आहे. शहरातील बिडबायपासला लागून असलेल्या मुकुंदनगर परिसरात ही घटना समोर आली आहे. आधी जेसीबीच्या काचा फोडण्यात आल्या आणि त्यानंतर हा जेसीबी अक्षरशः पेटवून देण्यात आला आहे. या परिसरातील एका वृद्ध महिलेच्या घराचा अतिक्रमण काढण्यासाठी पथक गेल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाल्याचे समोर येत आहे.
मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) शहरातील अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक महत्वाच्या रस्त्यांवरील आणि चौकातील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आहे. दरम्यान, अशीच काही कारवाई करण्यासाठी बिडबायपासजवळ असलेल्या मुकुंदनगर परिसरातील जिजाऊ नगर, राज नगर भागात महानगरपालिकेच अतिक्रमण विरोधी पथक पोहचले होते. यावेळी या भागात असलेल्या एका वृद्ध महिलेच्या घराचा अतिक्रमण काढण्यासाठी पथक गेल्यानंतर मोठा विरोध झाला. एवढंच नाही तर महानगरपालिकेच्या जेसीबीवर आधी दगडफेक आणि त्यानंतर जेसीबी पेटवून देण्यात आले आहे. ज्यात जेसीबी पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक पोलीस देखील पोहचले आहे.
थकीत मालमत्ता कर वसुली मोहीम देखील जोरात...
एकीकडे छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात येत असतानाच दुसरीकडे थकीत मालमत्ता कर वसुली मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे. प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उप आयुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर पालिकेच्या वतीने थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टी वसुली मोहीम तीव्र स्वरूपात सर्व झोन कार्यालय येथे राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज (26 ऑक्टोबर) रोजी झोन कार्यालय क्रमांक 1 चे सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक 15 मिटमिटा येथील जोसेफ लुईस बापिस्ट यांच्या सिल्वर लॉनवर थकबाकी असल्याने कारवाई करण्यात आली आहे. या लॉनवर एकूण 20 लाख 64 हजार रुपयांची थकबाकी असल्याने हे लॉन सील करण्यात आले. यावेळी पथक प्रमुख अविनाश मद्दी, अमीत रगडे, वसुली कर्मचारी विजय भालेराव, अश्फाक सिद्दीकी,शेख नईम यांनी कार्यवाही केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
काय सांगता! चक्क पीएचडी चोरीला, थेट राज्यपालांकडून दखल; संशोधन रद्द करण्याचा निर्णय