Marathwada Crop Damage : अवकाळी पावसाचा मराठवाड्याला मोठा फटका; 47 हजार 109 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
Unseasonal Rain : मराठवाड्यातील एकूण 47 हजार 109 हेक्टरवरील क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर : गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) मराठवाड्याला (Marathwada) मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यातील एकूण 47 हजार 109 हेक्टरवरील क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. ज्यात, 22 हजार 97 हेक्टरवरील जिरायत क्षेत्रावरील, तर 24 हजार 855 हेक्टरवरील बागायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच, एकूण 157 हेक्टरवरील फळबागचे देखील नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक नुकसान छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात झाले आहे.
मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान... (26 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर)
- बाधित झालेल्या गावांची संख्या : एकूण 598 (छत्रपती संभाजीनगर 509, परभणी 75, बीड 14)
- मयत व्यक्ती संख्या : एकूण 01 (हिंगोली 01)
- वीज पडून मृत्यू जनावरे : एकूण 180 ( छत्रपती संभाजीनगर 69, जालना 50, परभणी 57, हिंगोली 03 , नांदेड 04)
- पडझड झालेल्या घरांची आणि गोठ्यांची संख्या : एकूण 46 (छत्रपती संभाजीनगर 06, जालना 04,परभणी 32,हिंगोली 03,नांदेड 01,)
हिंगोली : ज्वारीचे पिक जमीनदोस्त
हिंगोली जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे ज्वारीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वाई गोरक्षनाथ येथील शेतकरी व्यंकटेश कदम यांच्या शेतातील अडीच एकर शेतीवरील ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. या ज्वारीच्या विकावर वर्षभराचे खाण्याचे आणि गुरांच्या चाऱ्याचे नियोजन असते. महिन्याभरा पूर्वी पेरणी केलेले ज्वारीचे पिक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे वर्षभर खायचे काय आणि शेतातील जनावरांना काय चारा द्यायचा आसा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. अशीच काही परिस्थिती जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे.
परभणी : तात्काळ मदत देण्याची मागणी
परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार अवकाळी पावसाला काही ब्रेक लागतांना दिसत नाही. काल अतिवृष्टी झाल्यानंतर आज पहाटे, दुपारी आणि सायंकाळी सुद्धा पाऊस कोसळताना पाहायला मिळाला. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतातील उभी ज्वारी, तूर आडवी झालीय, वेचणीस आलेला कापूस भिजलाय. अनेक ठिकाणी फळबाग आणि इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी स्वतः जिल्हाधिकारी यांनी केली. मात्र, प्रत्यक्षात अद्याप नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले नाहीत. एकुणच अगोदर खरिपात पाऊस नसल्याने नुकसान झाले आणि आता रब्बीत अवकाळी पाऊस पडत असल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे, सरकारने तात्काळ मदत देण्याची मागणी अडचणीत सापडलेला बळीराजा करू लागला आहे.
नांदेड : रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
नांदेड शहराला काल मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. सलग दुसऱ्या दिवशी दुपार पासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असल्याचे चित्र आहे. सकाळ पासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर दुपारी 4 वाजल्यापासून पावसाला सुरवात झाली. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या अवकाळी पावसाचा फटका नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील बसला असून, रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.
लातूर : दुसऱ्या दिवशी देखील पावसाने हजेरी लावली
लातूर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काल रात्री अहमदपूर तालुक्यात अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली. विशेष आज दुसऱ्या दिवशी देखील पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण थंड हवा आणि पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळाले. त्यामुळे याच फटका लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना बसला असून, रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: