Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, संभाजीनगरात आंदोलक उतरले धरणात; जलसमाधीचा इशारा
Maratha Reservation : यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. तर, याचवेळी आंदोलकांनी जलसमाधीचा इशारा दिल्याने पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात देखील मराठा आंदोलक आक्रमक (Maratha Protestors Aggressive) होतांना पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी वैजापूर शहरातील नारंगी सारंगी धरणात (Narangi-Sarangi Dam) उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. तर, याचवेळी आंदोलकांनी जलसमाधीचा इशारा दिल्याने पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मराठा आंदोलक आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातील नारंगी सारंगी धरणात आंदोलन करत आहे. आंदोलकांनी जलसमाधीचा इशारा दिला दिल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनास्थळी तैनात करण्यात आलाय. मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. तर, पोलिसांकडून आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज वैजापूर येथील नारंगी सारंगी धरणात उतरून जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा मराठा आंदोलकांकडून देण्यात आला होता. त्यामुळे आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आंदोलनाच्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. सोबतच, धरणाच्या ठिकाणी पाणबुडी देखील ठेवण्यात आल्या आहेत. तर,काही अनुचित प्रकार घडल्यास होडी देखील सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे. सोबतच आंदोलनाच्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आल्याचे पाहायला मिळत आहे.
जोरदार घोषणाबाजी...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सतत आंदोलनं सुरु आहेत. दरम्यान, आज देखील वैजापूरच्या नारंगी सारंगी धरणात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाचे बापाचे', 'देत कसं नाही, घेतल्या शिवाय राहत नाही,' अशा घोषणा यावेळी देण्यात येत आहे. तसेच, ओबीसीमधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी देखील आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
भुजबळांवर कारवाईची मागणी...
एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वैजापूरमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य करणारे मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा वैजापूर तालुक्यातील तितरखेडा आणि चिकटगाव येथील गावकऱ्यांनी दिला आहे. भुजबळ यांच्यावर कारवाई न झाल्यास पैठण येथील जायकवाडी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: