दानवे व सत्तार यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा; दानवे सेनाभवनात पोहचल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या
Maharashtra Politics : सिल्लोड येथील सेनाभवन कार्यालयात रावसाहेब दानवे स्वतः दाखल झाल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडमोडी पाहता कधी काय होईल, कोण कोणाची भेट घेईल आणि कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल सांगता येत नाही. अशातच राज्याच्या राजकारणात ज्यांची राजकीय जुगलबंदी संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यात यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याने नवीन चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे सिल्लोड येथील सेनाभवन कार्यालयात रावसाहेब दानवे स्वतः दाखल झाल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे बंद दाराआड झालेल्या या चर्चेवरून आता तर्कवितर्क लढवले जात आहे.
रावसाहेब दानवे आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची राजकीय जुगलबंदी छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्राला परिचित आहे. हे दोन्ही नेते एकेमकांवर खोचक टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. वेगवेगळ्या पक्षांमध्ये कार्यरत असलेले हे दिग्गज नेते अनेक वेळा एकाच व्यासपीठावर आले, पण तिथेही त्यांनी एकेमकांवरील टोलेबाजी करण्याची संधी सोडली नाही. एवढच काय तर रावसाहेब दानवे लोकभा निवडणूकीत पराभूत झाल्याशिवाय आपण डोक्यावरील टोपी उतरवणार नसल्याचा पण सत्तार यांनी केला आहे. आता असे असतांना या दोन्ही नेत्यांची अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. अब्दुल सत्तार यांना सिल्लोडमधील भाजपचा कडाडून विरोध आहे. मात्र दानवे यांच्या भेटीने त्यांनाही धक्का बसला आहे.
भाजप कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या
शुक्रवारी अजिंठा येथे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याच कार्यक्रमास रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर कृषिमंत्री सत्तार सिल्लोड येथील आपल्या सेनाभवन कार्यालयात दाखल झाले. मात्र काही वेळेने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे सुद्धा सेनाभवनात दाखल झाले. दानवे स्वतः सत्तार यांच्या कार्यालयात दाखल झाल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. मात्र यावेळी दानवे व सत्तार यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही.
सत्तारांना भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध...
अब्दुल सत्तार यांना पहिल्यापासूनच सिल्लोडच्या स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. सत्तार यांनी काँग्रेसचं हात सोडल्यावर ते भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक होते. जवळपास त्यांच्या प्रवेश देखील होण्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र सिल्लोडच्या स्थानिक भाजप नेत्यांनी सत्तार यांच्या प्रवेशाला विरोध केल्याने सत्तार यांचा प्रवेश हुकला आणि त्यांना शिवसेनेत जावे लागले. तर सत्तार यांना होणारा हा विरोध अजूनही कायम आहे. त्यामुळे दानवे यांनी सत्तार यांच्या कार्यालयात जाऊन घेतलेल्या भेटीमुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांना देखील धक्का बसला असल्याची चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: