NCP Party Office : औरंगाबादेतील राष्ट्रवादी भवन कोणत्या गटाकडे? संचालक मंडळात पाचपैकी तिघे जण शरद पवारांच्या गटाचे
NCP Party Office : औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी भवन शरद पवारांकडेच राहणार असण्याची शक्यता आहे.
NCP Party Office : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील राष्ट्रवादी भवन हे शरद पवार गटाकडेच राहणार असं दिसतंय. अजित पवार गटाकडून दावा केला जाऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाकडून हालचाली सुरू झाल्यात. शरद प्रतिष्ठान नावाने नोंदणी असलेल्या संचालक मंडळात पाचपैकी तिघे जण हे शरद पवार गटाचे आहेत. तर उर्वरित दोघांचे नावे बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचं कळतंय. शिवाय अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी भवनातील अजित पवार यांची छायाचित्रे हटवण्यात आली. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी भवन शरद पवारांकडेच राहणार असण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद शहरातील हडको एन-11 भागात राष्ट्रवादी काँग्रेस भवन आहे. हे भवन शरद प्रतिष्ठान नावाने नोंदणीकृत आहे. त्यावर पाच जणांचे एक विश्वस्त मंडळ आहे. या मंडळात स्वत: अजित पवार एक सदस्य आहेत. माजी आमदार किशोर पाटील हे या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तर विजयअण्णा बोराडे हे सचिव आहेत. या संचालक मंडळात नितीन देशमुख, द्वारकादास पाथ्रीकर यांचा समावेश आहे. पाचपैकी तीन जण हे शरद पवार गटात असल्यामुळे कायदेशीर दृष्टीनेही या भवनावर शरद पवार गटाचाच ताबा राहील, असे मानले जात आहे.
तर सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आ. कैलास पाटील हे अजित पवार गटात गेले आहेत. आता त्यांच्या जागी दुसरा अध्यक्ष नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. एक-दोन दिवसांत राष्ट्रवादी भवनात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली. या राष्ट्रवादी भवनाची जागा निवडण्यापासून ते बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यापर्यंत अजित पवार यांचा पुढाकार होता. या भवनाच्या विश्वस्त मंडळात स्वतः अजित पवार सदस्य असले तरी त्यांचे त्यात बहुमत नाही, असे दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी वाद...
राष्ट्रवादी पक्षात शरद पवारांचा आणि अजित पवार यांचे दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे आता दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा केला जात आहे. मात्र याचवेळी राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयावर देखील दोन्ही गटाकडून दावे केले जात आहे. नाशिकमध्ये तर राष्ट्रवादीचं कार्यालय ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गट थेट आमने-सामने आले होते. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे अशीच काही परिस्थिती आता इतर जिल्ह्यात देखील पाहायला मिळत असून, दोन्ही गट पक्षाच्या कार्यालयावर दावा करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Marathwada NCP MLA: मराठवाड्यातील 'राष्ट्रवादी' अजित दादांसोबतच; अकरापैकी सात आमदारांनी दिला पाठींबा