Maharashtra Politics: 'आता शिरसाटांचे काय होणार?, मंत्रीपदाच्या स्वप्नांवर पाणी फिरणार'; राजकीय समीकरणे बदलणार
Maharashtra Politics: रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी अजित पवारांसह ज्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यात एकही शिंदे गटाचा आमदार नव्हता.
Maharashtra Politics: अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवारांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे देखील बदलणार आहे. याचाच एक भाग म्हणजे शिंदे गटाचे प्रवक्ते व छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या मंत्रिपदाचे स्वप्न आता काहीसे धूसर झाले असल्याची चर्चा आहे. कालपर्यंत मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहणाऱ्या शिरसाट यांच्या समर्थकांना अजित दादांच्या एंट्रीने धक्का बसला आहे. कारण रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी अजित पवारांसह ज्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यात एकही शिंदे गटाचा आमदार नव्हता. त्यामुळे शिरसाठ यांच्या मंत्रिपदाची संधी पुन्हा एकदा हुकली.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना थेट पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त करणाऱ्या आमदारांपैकी संजय शिरसाठ पहिले आमदार होते. तसेच शिंदे गटातून उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटावर आक्रमक टीका करणाऱ्यांमध्ये संजय शिरसाट आघाडीवर होते. त्यामुळे पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय शिरसाठ यांना मंत्रीपद मिळणार असल्याचं जवळपास निश्चित समजले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. तर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला शंभर टक्के संधी मिळणार अशी अपेक्षा शिरसाट यांना होती. एवढच नाही तर अनेकदा त्यांनी आपल्या मंत्रिपदाच्या भावना बोलूनही दाखवल्या. मात्र रविवारी अचानक अजित पवारांची सरकारमध्ये एन्ट्री झाली आणि दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात देखील शिरसाट यांची संधी हुकली. त्यामुळे आता तिसरा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि त्यातही शिरसाट यांना संधी मिळणार का? याची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.
कॅबिनेट मंत्रीपदाची संधी हुकणार?
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळणारच असा दावा शिरसाठ यांनी केला होता. एवढच नाही तर आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आपणच होणार असेही शिरसाट यांनी दावा केला होता. मात्र आधीचे 20 आणि आत्ताचे 9 असे एकूण 29 कॅबिनेट मंत्री राज्यात झाले आहेत. त्यामुळे यापुढे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरीही मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांना राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. आणि असं झाल्यास शिरसाट यांच्या कॅबिनेट मंत्रीपदाचे स्वप्न देखील भंगण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली!
दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार संजय शिरसाट यांना शंभर टक्के संधी मिळणार असल्याची अपेक्षा शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना होती. मात्र अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने शिरसाट यांची संधी हुकली आहे. त्यामुळे यापुढे मंत्रिमंडळ विस्तार होणार का?, आणि झाल्यास मंत्रिमंडळ विस्तारात संजय शिरसाठ यांना संधी मिळणार का? याबाबत कार्यकर्त्यांची मात्र धाकधूक वाढली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: