Maharashtra Political Crisis : राज्यात आणखी छोटे-मोठे राजकीय भूकंप होणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
Maharashtra Political Crisis : या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी काही घडामोडी घडण्याचा अंदाज लावला जात आहे.
Girish Mahajan On Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात कालपासून अनपेक्षित घडामोडी घडत असून, अजित पवार यांनी अचानकपणे भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी 8 राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. दरम्यान, या घडामोडीनंतर भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मोठा दावा केला आहे. अजून छोटे-मोठे भूकंप होत राहतील कोण-कोण एकट पडेल ते पाहत राहा, असे वक्तव्य महाजन यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी काही घडामोडी घडण्याचा अंदाज लावला जात आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
राज्यातील घडामोडींवर प्रतिक्रिया देतांना गिरीश महाजन म्हणाले की, अजित पवार यांचे स्वागत आहे. देशाचे नेतृत्व फक्त मोदी करू शकतात हे त्यांना मान्य आहे. अजून छोटे मोठे भूकंप होत राहतील कोण-कोण एकट पडेल ते पाहत राहा. अजून बरेच लोक येणार आहेत, उद्धव ठाकरेच काय अजून कोण कोण एकट पडतं ते पहाच असा इशारा महाजन यांनी दिला आहे. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारही येणाऱ्या काही दिवसांत लवकरच होईल, असेही महाजन म्हणाले आहेत.
नाना पटोलेंची टीका...
अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीवरून नाना पटोले यांनी टीका केली आहे. बुलढाणा येथे झालेल्या अपघातामधील मयतांवर सामुहिक अंत्यसंस्कार सुरु असताना दुसरीकडे राजभवनात शपथविधी सुरु होता. भाजपने केलेल्या पापाची फळे त्यांना भोगावीच लागणार आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. रविवारचं दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस ठरला असेही पटोले म्हणाले. तर विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय आम्ही महाविकास आघाडीचे नेते बसून करू असेही पटोले म्हणाले.
भाजप अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री पदाचा करार...
दरम्यान राज्यातील घडामोडींवर प्रतिक्रिया देतांना ठाकरे गटाचे नेते यांनी देखील शिंदे गटासह भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच घरी जाणार आहेत. कारण अजित पवार आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी बोलणी झाली आहे. तर कालपर्यंत शरद पवार काही लोकांचे गुरु होते, मात्र त्यांनीच पवारांशी बेईमानी केली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच अजित पवार यांच्यासोबत किती आमदार गेले याबाबत कोणतेही स्पष्टता नसल्याचं सुद्धा राऊत म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
Sanjay Bansode : अनपेक्षितपणे संजय बनसोडेंना दुसऱ्यांदा मंत्रीपद मिळाले; कार्यकर्त्यांनी केला जल्लोष