धक्कादायक! महिलेच्या तोंडात माती टाकून अंगावरील दागिने लुटले; व्हिडिओ व्हायरल झाल्याने घटना उघडकीस
Chhatrapati Sambhajinagar News: याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी सुदर्शन घुगे (रा. आंतरवाली खांडी) या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका महिलेला चोरट्याने चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. विशेष म्हणजे, आरडाओरड करू नये म्हणून तोंडात माती टाकून अंगावरील सर्व दागिने लुटून नेले. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पैठणच्या आडूळ शिवारात घडली आहे. तर एक प्रकरणात आरोपींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हा सर्व प्रकार समोर आला आहे. तर याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी सुदर्शन घुगे (रा. आंतरवाली खांडी) या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आडूळ येथील गणेश जंगले हे गावात रसवंतीगृह चालवतात. दरम्यान त्यांची पत्नी रुक्मिणीबाई जंगले (वय 40) या शेतात काम करत होत्या. दुपारी लिंबाच्या झाडाखाली जेवण झाल्यानंतर त्या थोडी वामकुक्षी घेत होत्या. याचवेळी आरोपी सुदर्शन घुगे हा मोटारसायकलने तिथे आला. कोणी नसल्याचे पाहून त्याने रुक्मिणीबाई यांना मारहाण केली. तसेच आरडाओरड करू नये म्हणून त्यांच्या तोंडात माती टाकून चाकूचा धाक दाखवून 24 हजार रुपयांचे गळ्यातील ओरबडून कानातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. तसेच कोणाला सांगितल्यास मुलांसह सर्वांना जिवे मारण्याची धमकी दिली.
व्हिडिओ व्हायरल झाल्याने घटना उघडकीस...
या घटनेनंतर रुक्मिणीबाईंनी तात्काळ पती गणेश यांना फोन करून माहिती दिली. त्यांनी तात्काळ शेतात धाव घेतली. मात्र, आरोपी गुन्हेगार असून त्याची तक्रार जर आपण केली, तर तो पुन्हा खुन्नस काढून कुटुंबातील सदस्यांना हानी पोहोचवेल, अशी भीती या दाम्पत्याला वाटली. यामुळे त्यांनी दोन दिवस याची तक्रार दाखल केली नाही. मात्र आरोपी सुदर्शन घुगे याचा आणखी दुसऱ्या ठिकाणी शस्त्राचा धाक दाखवित लुटमारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो व्हिडिओ रुक्मिणीबाई आणि त्यांच्या पतीने पाहिला. घुगेला पोलिसांनी अटक केल्याचे समजल्याबरोबर त्यांनाही हिंमत आली. त्यांनी पाचोड पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर सोमवारी रात्री रुक्मिणीबाई यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.
आणखी एका घटनेत लुटण्याचा प्रयत्न...
दुसऱ्या घटनेत शितल श्रीपाल पाटणे (वय 41 वर्ष राहणार. कचनेर, छत्रपती संभाजीनगर) आणि त्यांचे वडील हे दोघे यांची सेवानिवृत्ती वेतन काढण्यासाठी आडुळ बुद्रुक बँकेमध्ये गेले होते. तेथे खात्यावरील 1 लाख 39 हजार काढून ते आपली मोटारसायकलवरून जात असताना, अब्दूलापूर तांडा फाट्याजवळ सुदर्शन भगवान घुगे आणि आकाश नारायण सोनवणे यांनी पाठलाग केला. तसेच कट मारून हातातील पैश्यांची पिशवी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे गावकऱ्यांनी त्याला पकडून त्याचा व्हिडिओ बनवला. याच व्हिडिओच्याआधारे पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
इतर महत्वाच्या बातम्या: