Mahavitran: शेतकऱ्यांसाठी महावितरणकडून ऑफर; 70 टक्के थकबाकी भरल्यास 30 टक्के माफ
Electricity News: आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 लाख 376 शेतकऱ्यांनी 73 कोटी 9 लाख रुपये भरले आहेत.
Electricity News: मार्च महिन्याच्या शेवटी थकबाकी वसुली करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाकडून वसुली मोहीम राबवल्या जातात. दरम्यान महावितरणकडून देखील अशीच काही योजना शेतकऱ्यांसाठी (Farmers) जाहीर करण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषी पंपाची 70 टक्के थकबाकी भरल्यास 30 टक्के रक्कम माफ होणार आहे. यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 लाख 376 शेतकऱ्यांनी 73 कोटी 9 लाख रुपये भरले आहेत. तर 31 मार्चपर्यंत ही योजना लागू राहणार आहे.
महावितरणकडून कृषी वीज धोरण 2020 राबविले जात आहे. या योजनेचे दुसरे वर्ष येत्या 31 मार्चला संपणार असल्याने तोपर्यंतच ही सवलत आहे. कृषी धोरणात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज व विलंब आकारात माफी, तर सुधारित थकबाकीतही 30 टक्के सूट देण्यात आली आहे. तर त्यानंतर 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या काळात थकबाकीवर 20 टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे आणखी तीन दिवस या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे.
सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हा!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 लाख 26 हजार 489 शेतकऱ्यांकडे निर्लेखन, व्याज व विलंब आकारातील सवलत दिल्यानंतर 1 हजार 622 कोटी 97 लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. तर येत्या 31 मार्चला 30 टक्के माफीचीही मुदत संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषी धोरणात सहभागी होऊन 30 टक्के सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हावे, यासाठी शेतकऱ्यांनी थकबाकी जमा करून महावितरणच्या वतीने दिलेल्या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई
दरम्यान वीजबिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात कारवाई करत 9 हजार 71 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरीही वीजपुरवठा खंडित केला जात आहे. तर जालना मंडळातील 1 लाख 7 हजार 624 ग्राहकांकडे 219 कोटी 47 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. तर थकबाकी न भरणाऱ्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील 9 हजार 71 जणांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
कारवर पोलीस नावाचं स्टीकर अन् अंबर दिवाही, पथकाने पकडताच समोर आली धक्कादायक माहिती