(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhaji Nagar : आमदाराचा एक फोन अन् एसटी बस हजर; विद्यार्थ्यांची गैरसोय दूर
Chhatrapati Sambhaji Nagar : फुलंब्री शहर व परिसरातून दररोज अनेक विध्यार्थी सकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षणासाठी जातात.
Chhatrapati Sambhaji Nagar News : लोकप्रतिनिधी यांनी ठरवलं तर काय होऊ शकते आणि लोकांना त्याचा कसा फायदा होते याचं उदाहरण छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) फुलंब्रीमध्ये पाहायला मिळाले. फुलंब्री शहरातून छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षणासाठी दररोज शेकडो विद्यार्थी प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर एसटी बस (ST Bus) उपलब्ध करुन देण्याची मागणी गेल्या वर्षभरापासून केली जात आहे. मात्र असे असताना एसटी प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते. दरम्यान याबाबत माहिती मिळताच फुलंब्री तालुक्याचे आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी एसटी आगारप्रमुखांना फोन करताच बस हजर झाली. तर या एसटी बसमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे.
फुलंब्री शहर आणि परिसरातून दररोज अनेक विद्यार्थी सकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगर इथे शिक्षणासाठी जातात. परंतु, या वेळेला एसटी महामंडळाची बस नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी एसटी महामंडळाकडे सकाळी 6 वाजता बस उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. पण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एसटी बस सुरु करण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांना ही बाब सांगितली. त्यानंतर आमदार बागडे यांनी तातडीने छत्रपती संभाजीनगरचे आगारप्रमुख सचिन क्षीरसागर यांना फोन केला. फुलंब्री इथून सकाळी 6 वाजता एसटी बस सुरु करा, असे सांगितले. यावेळी क्षीरसागर यांनी सिल्लोड इथून सकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीनगरसाठी बस सोडली जाईल आणि ती फुलंब्री इथे सकाळी 6 वाजता येईल, असे सांगितले.
अखेर बस सकाळी 6 वाजता फुलंब्रीत पोहोचली...
गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करुन देखील एसटी महामंडळाचे अधिकारी हे विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तर एसटी महामंडळाच्या भूमिकेमुळे पालक देखील हतबल झाले होते. मात्र बागडे यांनी फोन करताच दुसऱ्याच दिवशी 16 मे रोजी सकाळी 6 वाजता फुलंब्री इथे छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बस उपलब्ध झाली. ही बस आता इथून दररोज धावणार असल्याचे संबंधितांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एसटी बसमध्ये बसून आमदार बागडे यांचे आभार मानले. पण यातून एसटी महामंडळाची सर्वसामान्य आणि राजकीय नेत्यांना मिळणारी वागणूक देखील समोर आली.
इतर महत्वाच्या बातम्या:
पती-पत्नी विकायचे गर्भपाताच्या गोळ्या, औषध प्रशासन विभागाने केली कारवाई