पती-पत्नी विकायचे गर्भपाताच्या गोळ्या, औषध प्रशासन विभागाने केली कारवाई
Chhatrapati Sambhaji Nagar : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरिक्षक अंजली मंगलअप्पा मिटकर यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) पाचोड गावात एका मेडिकल शॉपमध्ये पती-पत्नी अवैधरीत्या चक्क गर्भपाताच्या (Abortion) गोळ्या विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सापळा लावून या मेडिकल शॉपवर कारवाई केली आहे. तर या प्रकरणी पाचोड पोलिसात आरोपी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरिक्षक अंजली मंगलअप्पा मिटकर यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाग्यश्री रणजित जगताप आणि रणजित जगताप असे आरोपींचे नावं आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचोड येथील वैष्णवी मेडीकल अॅण्ड इक्वीपमेंटस येथे अवैधरित्या गर्भपातासाठी लागणारे औषधे विक्री केली जात असल्याची माहिती औषध निरिक्षक अंजली मिटकर यांना मिळाली होती. त्यामुळे कारवाईसाठी त्यांनी आपल्या पथकासह सापळा लावला. यावेळी त्यांनी 9 मे रोजी एक बनावट ग्राहकाला पाचशे रुपये देऊन र्भपातासाठी लागणारे औषधे घेण्यासाठी भाग्यश्री जगताप यांच्या वैष्णवी मेडीकलवर पाठवले. दरम्यान यावेळी त्याला तत्काळ औषधे विकत मिळाले देखील. तर औषधे मिळताच या बनावट ग्राहकाने मिटकर यांना इशारा केला.
दरम्यान कारवाईसाठी पाठवलेल्या बनावट ग्राहकाने सिग्नल देताच मिटकर यांच्या पथकाने पंचासह या मेडिकलवर छापा मारला. यावेळी बनावट ग्राहकाने खरेदी केलेली गर्भपातासाठी लागणारी औषधीची 05 गोळयांची एक स्ट्रिप ताब्यात घेण्यात आली. तसेच बनावट ग्राहकाला देण्यात आलेली 500 रूपयाची नोट दुकानातील गल्ल्यात आढळून आली. विशेष म्हणजे कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या गर्भपाताच्या औषधावरील समुह क्रमांक, उत्पादन तिथी, मुदतबाहय दिनांक, MRP मिटवलेली होती.
विना बिल खरेदी केले औषध...
कारवाई करण्यात आलेल्या मेडिकल परवानाधारक तथा रजिस्टर्ड फार्मासिस्ट भाग्यश्री रणजित जगताप आणि त्यांचे पती यांच्याकडे संबंधित गर्भपाताच्या गोळ्याबाबत पथकाने चौकशी केली असता त्यांच्याकडून कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आली आहे. तर याच चौकशीत रणजित जगताप यांनी संबंधित गर्भपातासाठीचे औषध गणेश भेरे नावाच्या व्यक्तीकडून रोखीने पैसे देउन विना बिल खरेदी केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यानुसार पाचोड पोलिसात या प्रकरणी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: