Chhatrapati Sambhaji Nagar : नामांतराच्या समर्थनात 19 मार्चला छ. संभाजीनगरात 'हिंदू जन गर्जना मोर्चा'
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढला जाणार आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या मुद्यावरून एकीकडे राजकीय वातावरण तापत असताना, दुसरीकडे संघटना आणि पक्ष समर्थनात-विरोधात रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) 19 मार्च रोजी रविवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जन गर्जना मोर्चा काढला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढला जाणार आहे.
याबाबत विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अध्यक्ष संजय अप्पा बारगजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी दहा वाजता शहरातील क्रांती चौकातून सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जन गर्जना मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चासाठी जिल्हाभरातून सकल हिंदू समाजाचे लोकं सहभागी होणार असून, मोर्चा सर्व हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे. तर हिंदू जनगर्जना मोर्चाच्या आयोजनासाठी छत्रपती संभाजीनगरात विविध पक्ष, संघटना आणि नागरिकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये 19 मार्च रोजी मोठा मोर्चा काढण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जन गर्जना मोर्चा काढला जाणार असून, यासाठी रीतसर पोलीस आयुक्तालयात परवानगीसाठी अर्ज केला जाणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर नामांतरानंतर एमआयएम सोबतच इतर संघटनांनी विरोध दर्शवीत आंदोलन सुरू केले आहे. तर औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीकडून कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील हा मार्च काढण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी खासदार जलील यांच्यासह 1500 लोकांवर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे आता सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात येणाऱ्या हिंदू जन गर्जना मोर्चाला पोलीस परवानगी देणार का? हे देखील पाहणे महत्वाचे राहणार आहे.
चौका-चौकात अर्ज भरून घेतले जातायत!
दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या निर्णयाला कुठे समर्थन मिळत आहे, तर कुठे विरोध होत आहे. विशेष म्हणजे नामांतराच्या निर्णयाच्या विरोधात आणि समर्थनात विभागीय आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल करण्यात येत आहे. यासाठी वेगेवेगळ्या पक्ष आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून मोहीम राबवली जात आहे. तसेच चौका-चौकात अर्ज भरून घेण्यासाठी कॅम्प लावण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याने जाणारे नागरिक अर्ज भरून देताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यात तरुणांची मोठ्याप्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :