Rain Update : छत्रपती संभाजीनगरात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Rain Update: गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे गहू अक्षरशः आडवा झाला असून, काढणीसाठी शेतकऱ्यांची धरपड सुरु आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Rain Update: हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून (15 मार्च) राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राज्यातील काही भागात गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळपासून अनेक भागात पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. तर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर या अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका बसत आहे.
गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. अशातच आता पुन्हा हवामान विभागाने आजपासून मराठवाड्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर सकाळपासून छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवर देखील पाऊस पडत आहे. तर निपाणी शिवारात देखील रिमझिम पाऊस पडताना पाहायला मिळत आहे.
गव्हाचे पीक मातीमोल होण्याची शक्यता
मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे आता पुन्हा अवकाळी पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आज मराठवाड्यात काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे गहू अक्षरशः आडवा झाला असून, काढणीसाठी शेतकऱ्यांची धरपड सुरु आहे. अशात पुन्हा पाऊस पडत असल्याने गव्हाचे पीक मातीमोल होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी....
दरम्यान हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने, याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. उन्हाळी पीक काढणीला आले असतानाच आता अवकाळीने चिंता वाढवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पिकांची सोगणी करुन ठेवली असेल तर झाकून ठेवावे. तसेच शक्य असेल तेवढ्या लवकर पिकांची काढणी करुन घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. विशेष करुन गव्हाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान गव्हाचेच झाले आहेत. तसेच फळ बागांना देखील याचा फटका बसला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Maharashtra Weather : राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज, शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता