काय सांगता! 16 किलो काजूसह 10 किलो बदामावर चोरट्यांनी मारला ताव; घटना सीसीटीव्हीत कैद
Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकरणात दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्यांच्या विरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) एक आगळीवेगळ्या चोरीची घटना समोर आली आहे. शहरातील शहागंज भागात असलेल्या एका दुकानात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांनी काजू बदामवर ताव मारला आहे. यावेळी चक्क चोरट्यांनी 16 किलो काजू 10 किलो बदामावर ताव मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्यांच्या विरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
सिटी चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अब्दुल सलाम (रा. लोटाकारंजा) यांचे शहागंज भागातील भाजीमंडईत ए.आर. ट्रेडर्स नावाचे सुक्यामेव्याचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे 29 मे रोजी रात्री साडेदहा वाजता अब्दुल सलाम हे दुकान बंद करून घरून निघून गेले. 30 मे रोजी सकाळी 10 वाजता दुकान उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांना दुकानाच्या वरचे पत्रे उचकटलेले दिसले. चोरांनी दुकानातील 11 हजार 250 रुपये किमतीची 1 किलो वजनाची काजूची 16 पाकिटे, 7 हजार 200 रुपये किमतीचे एक किलो वजनाची बदामाची 10 पाकिटे चोरून नेल्याचे दिसले. एकूण 18 हजार 450 रुपयांचे काजू बदामावर चोरट्यांनी ताव मारल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे मोहम्मद अब्दुल सलाम यांनी सिटी चौक पोलिसांना घटनेची माहिती कळविली.
पोलिसांनी दुकानाची पाहणी केली. त्यानंतर दुकानदाराच्या तक्रारीवरून काजू बदामावर ताव मारणाऱ्या चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. यापूर्वीही चोरट्यांनी एका घटनेमध्ये डाळी, ज्वारीचे पीठ चोरून नेले होते. त्याशिवाय एका किराणा दुकानातून विविध प्रकारच्या वस्तूही चोरण्यात आल्या होत्या. तर पुढील तपास सिटी चौक पोलिस तपास करीत आहेत.
महिलांच्या गळ्याला चाकू लावून चोरी...
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत सिल्लोड शहराबाहेर असलेल्या न्यू भारत नगर मध्ये चार चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री एक ते दोन च्या सुमारास दरवाज्याचे कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश करत एक लाख 75 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी या घटनेत घरातील एकाला मारहाण केली. महिलांच्या गळ्याला चाकू लावून आणि घरातील इतर 13 सदस्यांना एका खोलीत कोंडून ही जबरी चोरी केली. पोलिसांनी बुधवारी या प्रकरणी चोरीचे गुन्हे दाखल केले आहे. तर चोरट्यांच्या मारहाणीत शेख आफताब शेख शफिक (वय 25, रा. न्यू भारत नगर) हे गंभीर जखमी झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: