Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांच्या ट्विटवर आक्षेपार्ह कमेंट, माहिती मिळताच पोलिसांनी 'सीए'ला ठोकल्या बेड्या
Chhatrapati Sambhaji Nagar : पोलिसांनी तत्काळ सूत्र हलवत काही तासांत कमेंट करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : राजकीय नेतेमंडळी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना देखील सोशल मिडीयावर (Social Media) ट्रोल करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. दरम्यान अमृता फडणवीस यांच्याबद्दल एका ट्विटवर आक्षेपार्ह कमेंट करणे छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) 'सीए'ला चांगलेच महागात पडले आहे. ट्विटवर (Twitter) कमेंट करताना अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचा लक्षात येताच शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी देखील तत्काळ सूत्र हलवत काही तासांत कमेंट करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. अतिष ओमप्रकाश काबरा (वय 35, रा. नरहरी वसंत विहार, न्यु एसबीएएच कॉलनी, ज्योतीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
अमृता फडणवीस या सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफार्मवर नेहमी सक्रिय असतात. विशेष म्हणजे सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. समाजात घडणाऱ्या घटना, घडामोडी, राजकीय घडामोडी आदींवर त्या सोशल मीडियावरून आपलं मत मांडत असतात. अनेकदा त्यांच्या पोस्टची माध्यमांमध्ये दखल घेतली जाते. मात्र याचवेळी त्यांच्या पोस्ट विरोधात केमेंट करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. तर अनेकदा त्यांना ट्रोल केले जाते. त्यांच्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट करण्यात येतात. दरम्यान अशीच काही केमेंट छत्रपती संभाजीनगरमधील अतिष काबराने केली होती. ज्यामुळे त्याला थेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 जून रोजी अमृता फडणवीस यांच्या ट्विटर पोस्टवर पेशाने सीए असलेल्या अतिषने आक्षेपार्ह कमेंट केली होती. दरम्यान शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. तर पदाधिकाऱ्यांनी याची माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांना दिली. त्यामुळे याबाबत पोलिसांना कळवण्यात आले. तर याबाबत माहिती मिळताच तत्काळ सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांनी आरोपी अतिषच्या प्रोफाईलवरुन त्याचा शोध सुरू केला. तसेच त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. तसेच भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांच्या फिर्यादीवरुन अतिषवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस लक्ष ठेवून...
गेल्या काही दिवसांत सायबर पोलीस अधिक सक्षम झाले आहेत. नवनवीन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेरच्या माध्यमातून सोशल मीडियावर होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवणे पोलिसांना सोपे झाले आहेत. त्यामुळे सायबर पोलीस 24 तास पेट्रोलिंग करत असतात. सोशल मीडियावर पडणाऱ्या प्रत्येक पोस्टवर त्यांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे आक्षेपार्ह कमेंट, पोस्ट किंवा व्हिडिओ-फोटो टाकल्यास तत्काळ पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. तसेच गुन्हा दाखल झाल्यावर जेलची हवा देखील खावी लागते. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर करतांना काळजी घेतली पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या: