उपजिल्हाधिकारी पदाची नोकरी सोडून राजकारणात येण्याचा निर्णय; नगरसेविका ते राष्ट्रीय सचिव, कोण आहेत विजया रहाटकर?
Vijaya Rahatkar : भाजपच्या राष्ट्रीय नेत्या विजय रहाटकर यांचा नगरसेविका ते भाजपचे राष्ट्रीय सचिव पदापर्यंतचा राजकीय प्रवास अतिशय खडतर आणि संघर्षमय आहे.
Vijaya Rahatkar Political Career : शासकीय नोकरी मिळवण्यासाठी आज लाखो तरुण-तरुणी घरदार सोडून पुणे, औरंगाबाद सारख्या शहरात राहून प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यात एवढं करून नोकरी मिळणारच याची कोणतेही हमी नाही. मात्र, उपजिल्हाधिकारी पदाची नोकरी सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेणं म्हणजेच याला धाडस लागते. पण, हेच धाडस करणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या विजय रहाटकर (Vijaya Rahatkar) यांचा नगरसेविका ते भाजपचे राष्ट्रीय सचिव पदापर्यंतचा राजकीय प्रवास अतिशय खडतर वं संघर्षमय आहे. मात्र, कुटुंबाचे पाठबळ मिळाल्यानेच त्यांना यशस्वी वाटचाल करता आली.
पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असताना रहाटकर यांनी एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, याच काळात त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली आणि परीक्षेत पास देखील झाल्या. पुढे त्यांची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली. पण लोकांची काम करण्याची प्रचंड इच्छा असलेल्या रहाटकर यांना राजकारणात यावे वाटले. प्रशासकीय सेवेत काम करतांना मर्यादा आणि बंधने येतात, त्यामुळे त्यांनी राजकीय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांच्या या धाडसी निर्णयाला कुटुंबातील सदस्यांचा पाठींबा मिळणार का? याबाबत त्यांना चिंता होती. मात्र, त्यांच्या इच्छेला कुटुंबाच्या पाठबळाचे पंख मिळाले आणि रहाटकर या राजकारणात आल्या.
राजकारणात येण्याच्या निर्णय घेतल्यावर विजया रहाटकर यांच्या राजकीय कारकर्दीला प्रत्यक्षात 1995 मध्ये सुरवात झाली. महानगरपालिका निवडणुका लागल्या होत्या आणि याच निवडणुकीत उतरण्याचा निर्णय रहाटकर यांनी घेतला. भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आतापर्यंत कधीही निवडणूक न लढवणाऱ्या रहाटकर यांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली. पण उमेदवारी मिळेल याची त्यांना बिलकुल अपेक्षा नव्हती. पण पक्षाकडून जाहीर झालेल्या यादीत त्यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, आयुष्यातील पहिली निवडणूक त्यांनी किराणचावडी वार्डातून लढवली. पण त्यांचा यावेळी पराभव झाला. पण, पराभवाच्या दुःखात न पडता त्यांनी पक्षाचे जोमाने काम सुरु केले. पुढे महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने 2007 मध्ये त्यांना महापौर पदाची जबाबदारी दिली.
दुसऱ्यांदा राष्ट्रीय सचिवपदावर नियुक्ती
पक्षाच्या कामात स्वतःला झोकून देणाऱ्या रहाटकर यांच्या कामाची वेळोवेळी दखल घेण्यात आली. नगरसेवक, महापौर, युवा मोर्चा अध्यक्ष, राज्य महिला मोर्चाचे अध्यक्षपद, वीज मंडळाच्या समितीवर नियुक्ती, महिला आयोग अध्यक्ष आणि आता थेट भाजपचे राष्ट्रीय सचिव पदापर्यंतचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय ठरला आहे. राज्याच्या राजकारणात जरी रहाटकर यांची चर्चा नसली तरीही त्यांची भाजप सारख्या मोठ्या पक्षात राष्ट्रीय पातळीवर महत्वाचे स्थान आहे. तर शनिवारी जाहीर झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत त्यांची दुसऱ्यांदा राष्ट्रीय सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या: