Aurangabad : औरंगाबादच्या गायकवाड शेत वस्तीवर चोरांचा धुमाकूळ; पोलिसांनी 12 तासांत ठोकल्या बेड्या
Aurangabad Crime News : गुन्हे शाखेने तपासाचे चक्र फिरवत या चोरांना अवघ्या 12 तासांत बेड्या ठोकल्या आहेत.
Aurangabad Crime News : औरंगाबाद (Aurangabad) वैजापूर तालुक्यातील बेलगाव शिवारातील गायकवाड वस्तीवर मंगळवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली होती. दरम्यान यावेळी चोरांनी एका दाम्पत्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण 71 हजार रुपयांचा ऐवज लुटला. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्हे शाखेने तपासाचे चक्र फिरवत या चोरांना अवघ्या 12 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शंकर रतन भोसले (वय 23 वर्षे रा. पडेगाववस्ती, कोपरगाव) याला अटक केली आहे. तसेच दोन जण फरार झाले आहेत.
समाधान श्रीधर गायकवाड (रा.बेलगाव ता. बैजापूर) यांनी पोलीस ठाणे वैजापूर येथे दिलेल्या तक्रारी वरुन जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखाचे पथक तयार करून या गुन्ह्याचे अनुषंगाने घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. तर, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून अशा प्रकारचे शेतवस्तीवर गुन्हे करणारे संशयित व्यक्तिंबद्दल माहिती घेतली. तसेच यावेळी त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदरचा जबरी चोरीचा गुन्हा हा कोपरगाव येथील शंकर रतन भोसले याने त्याचे साथीदारामार्फत केला आहे. तर, खात्रीलायक बातमी मिळाल्याने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने रेकी करुन आरोपी हे मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी आहे याची खात्री केली. तसेच वैजापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार यांना सदर ठिकाणी बोलावून त्यांना आरोपी बाबतची माहीती दिली.
दोन आरोपी फरार...
त्यानंतर या ठिकाणी सापळा लावून छापा मारला असता पोलीसांना पाहून आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी यावेळी आरोपींचा पाठलाग करुन एक आरोपी पकडला. तसेच त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव नाव शंकर रतन भोसले असे सांगितले. तसेच त्याचे सोबतचे दोन आरोपी ऊसाचे शेतात पळून गेले. पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलेल्या आरोपीस विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्याने त्याचे दोन साथीदारासह बेलगाव येथील शेतवस्तीवर जबरी चोरी केली असल्याचे कबूल केले आहे. तसेच इतर दोन्ही आरोपींचा शोध घेतला जात आहे.
यांनी केली कारवाई...
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, सपोनि सुधीर मोटे, पोउपनि भगतसिंग दुल्लत, मधुकर मोरे, पोह दिपेश नागझरे, संजय घुगे, रवि लोखंडे, वाल्मिक निकम, पोना अशोक वाघ, राहुल गायकवाड, योगेश तरमाळे, जिवन घोलप, चालक शेख अख्तर, तांदळे, डमाळे यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
ती रडत होती, ओरडत होती...पण तो मारतच होता; दुसऱ्या मुलासोबत दिसल्याने तरुणीला बेदम मारहाण