Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
Jayant Patil : शेकापचे नेते जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाचं खोटं पत्र व्हायरल करण्यात येत असल्याचं म्हटलं. या प्रकरणी तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले.
रायगड : उरण आणि पेण मतदार संघात महायुतीचा उमेदवारांना पाठींबा असलेले शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल करण्यात आल्याची माहिती शेकापचे प्रमुख जयंत पाटील यांनी दिली आहे. खोटं पत्र काढणाऱ्यांवर फौजदारी तक्रार करण्यात येणार असल्याचं म्हटलं. शेकापचे सरचिटणीस राजू कोरडे हे पोलिसांमध्ये आणि सायबरमध्ये तक्रार करण्यासाठी गेले असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे उरण आणि पेण मतदार संघात आघाडीवर असलेले उमेदवार यांना पाठिंबा न देता युतीतील उमेदवार महेश बालदी आणि रवीशेठ पाटील यांना मतदान करा अशा स्वरूपाचे खोटं पत्र व्हायरल करण्यात आलं आहे, अशी माहिती जयंत पाटील दिली.
खोटं पत्र सध्या समाज माध्यमामध्ये फिरत असताना शेकापचे जयंत पाटील यांनी यावर तातडीनं निवडणूक आयोगाला देखील पत्र लिहिलं आहे. खोटं पत्र व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या लेटर पॅड वर जयंत पाटील यांची खोटी सही आणि शिक्का मारून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केल्याने या प्रकरणात दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
आज संध्याकाळी शेकापचे दोन्ही जे निवडणूक जिंकून येणारे उमेदवार उरणचे प्रीतम म्हात्रे आणि पेणचे अतुल म्हात्रे या दोघांना पक्षानं उमेदवारी रद्द करुन रवी शेठ आणि बालदींना पाठिंबा दिल्याचं फेक पत्र पार्टीच्या लेटरवर व्हायरल करण्यात आलं. त्या लेटरहेडवरील नावं दहा वर्ष जुनी आहेत, त्यापैकी काही जणांचा मृत्यू झाला आहे. खोट्या पत्राबाबत तक्रार करण्यासाठी राजू कोरडे पोलीस आणि सायबरकडे गेलेले आहेत.
पेण आणि उरणमधील शेकाप कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांचं आवाहन
सर्व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, पेण आणि उरणमधील शेकापचे हितचिंतक यांना आवाहन आहे की व्हायरल होत असलेलं पत्र खोटं असल्याचं जयंत पाटील म्हणाले. रसायनीमध्ये घेतलेल्या सभेला प्रचंड जनसुमदाय उपस्थित होता. अतुल म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे यांच्या सभांना प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. त्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आपला पराभव समोर दिसत असताना हे कृत्य करण्यात आलं आहे. ज्यांनी पत्र व्हायरल केलं त्यांच्यावर देखील तक्रार दाखल करणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले. पत्र व्हायरल करण्यामागं महेश बालदी असून त्यांना अटक करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
इतर बातम्या :