डबल धमाका स्कीम! दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने मुद्दलही लुटली; 22 जणांना लाखोंचा गंडा
Fraud Case in Aurangabad : या प्रकरणी मध्य प्रदेशच्या बंटी-बबलींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fraud Case in Aurangabad : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील 'आदर्श घोटाळा' (Adarsh Scam) चर्चेत असतानाच आता आणखी एक फसवणूकीची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. डबल धमाका स्कीममध्ये दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवत शहरातील शेअर मार्केटिंग करणाऱ्या महिलेला आणि तिच्या 22 खातेदारांना तब्बल साडेसत्तावीस लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. तर या प्रकरणी मध्य प्रदेशच्या बंटी-बबलींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल सिंह उर्फ सौरभ (रा. मध्य प्रदेश) आणि निहारिका अग्रवाल असे आरोपींचे नावं आहेत. तर अलका आत्माराम रूपवते (वय 40, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला गेला आहे.
रूपवते यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा शेअर मार्केटिंगचा व्यवसाय आहे. शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात भारत बाजार भागात त्यांचे एएस व्हेंचर नावाने ऑफिस आहे. दरम्यान एप्रिल 2021 मध्ये रूपवते या ऑनलाईन शेअर मार्केटचा क्लास करत होत्या. या वेळी त्यांची ओळख आरोपी अखिल सिंह उर्फ सौरभ याच्यासोबत झाली. अखिल सिंह हा शेअर मार्केटचे काम करतो अशी माहिती मिळाल्यामुळे रूपवते यांनी अखिल सिंहशी संपर्क साधला होता. यावेळी अखिल सिंहने त्यांना तो आयआयएफएल कंपनीमध्ये काम करीत असल्याची माहिती दिली होती. रूपवते यांनी त्याला सुरुवातीला ट्रेडिंगसाठी वीस हजार रुपये दिल्यानंतर महिन्याभराने त्याने तीस हजार रुपये परतावा दिला. त्यामुळे त्याच्यावर त्यांना विश्वास बसला.
अशी केली फसवणूक...
अखिल सिंह याने रूपवते यांना शेअर मार्केटचे ऑफिस उघडण्याचे सांगितले. तसेच निहारिका ही अकाउंट मॅनेजर असल्याचे सांगून, सर्वे व्यवहार तीच संभाळत असल्याचे सुद्धा सांगितले. पुढे काही स्कीममध्ये 30 हजार गुंतवल्यास 1 लाख रुपये, 50 हजार गुंतवल्यास दीड लाख आणि 1 लाख गुंतवल्यास 3 लाख रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळे या स्कीममध्ये रूपवते यांच्या 18 क्लायंटनी 15 लाख रुपये गुंतवले. यामध्ये त्यांना परतावादेखील देण्यात येत होता. दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये सिंह याने रूपवते यांची भेट घेत डबल धमाका स्कीमची माहिती देत, यामध्ये रक्कम गुंतवल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले. ज्यात रूपवते यांच्या 22 क्लायंटनी 27 लाख50 हजारांची गुंतवणूक केली आणि तिथेच घात झाला. कारण मार्च 2023 मध्ये या स्कीमचा परतावा देण्याची मुदत संपल्यानंतर परतावा मिळाला नसल्याने रूपवते यांनी अखिल सिंह तसेच निहारिका यांच्याशी मोबाइलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते बंद आढळून आले.
पोलिसांत गुन्हा दाखल...
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे रूपवते यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी अखिल सिंह आणि निहारिका अग्रवाल यांच्याविरुद्ध सिडको एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Adarsh Scam : 'माझे वय झालं, काहीच आठवत नाही', 'आदर्श घोटाळा' करणाऱ्या मानकापेचं पोलिसांना अजब उत्तर