काय सांगता! चोरीच्या सोन्याला पाय फुटले, पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह?; पाहा औरंगाबादमध्ये काय घडलं?
Aurangabad Crime News : पोलिसांची भूमिका आणि केलेल्या कारवाई बाबतचा दावा संशयास्पद वाटत असल्याचे बोलले जात आहे.
Aurangabad Crime News : औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज महानगर भागातील रांजणगावच्या मंगलमूर्ती ज्वेलर्समध्ये 8 ऑगस्टला तारखेला जबरी चोरी झाली होती. तीन चोरटे चाकू घेऊन दुकानात घुसले आणि दुकानात बसलेल्या मुकुंद बेदरे यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी चोरांनी त्यांच्या हातावर चाकूचं वार केले, तोंडात गोळा कोंबला आणि हातपाय बांधले. तसेच दुकानातील 85 तोळे सोनं, 3 किलो चांदी आणि पंधरा हजार रुपयांचा ऐवज तिघांनी लुटून नेला. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी 20 तोळे सोनं चोरीला गेल्याची तक्रार घेतली. तसेच, नंतर आपण पुरवणीमध्ये वाढीव सोन्याची नोंद घेऊ असं बेदरे यांना सांगितले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मात्र, आठ तारखेपासून कालपर्यंत बेदरे सातत्याने पोलीस ठाण्यात 85 तोळ्याच्या जीएसटीच्या पावत्या घेऊन चकरा मारत आहे. त्यांची पुरवणी तक्रार घेऊन जातात, मात्र ती काही पोलीस स्वीकारत नसल्याचा आरोप बेदरे यांनी केला आहे. त्यातच काल क्राईम ब्रँचने खुलासा केला की, आम्ही या प्रकरणातील तीन आरोपी पकडले आहेत. त्यांच्याकडून 24 तोळे सोने पकडले असल्याचे पोलीस सांगत आहे. त्यामुळे बेदरे यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांचे 85 तोळे सोने चोरीला गेले आहे, मग 61 तोळे सोनं कुठे आहे. तर 20 तोळ्याची तक्रार घेतली असतांना पोलिसांनी पकडलेल्या 24 तोळ्यातील 4 तोळे सोनं कोणाचं आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे पोलिसांची भूमिका आणि केलेल्या कारवाई बाबतचा दावा संशयास्पद वाटत असल्याचे बोलले जात आहे.
संशयास्पद भूमिका?
- दुकानातील 85 तोळे सोनं चोरीला गेली असतांना पोलिसांनी फक्त 20 तोळ्याचीच तक्रार का घेतली?
- पुरवणीमध्ये वाढीव सोन्याची नोंद घेऊ असं बेदरे यांना सांगितले असतांना ती तक्रार का घेतली जात नाही?
- पोलिसांकडून संपूर्ण मुद्देमाल 24 तोळे सोने पकडले असल्याचा दावा केला जात असल्याने 61 तोळे सोनं कुठे आहे?
- पोलिसांनी 20 तोळ्याची तक्रार घेतली पण 24 तोळे पकडल्याचा दावा केला, मग 4 तोळे सोनं कोणाचं आहे?
- पोलिसांनी तक्रारदाराला तपासासाठी दोन लाख रुपये मागणे योग्य आहे का?
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा रस्त्यावर उभी असलेली मोटारसायकल चोरी करण्यात आल्याचा आरोप करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यातच आता एका दरोड्याच्या प्रकरणात पोलिसांची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आणि गुन्हा उघडकीस आल्यावर सादर केलेला मुद्देमाल सर्वच संशयास्पद आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर पोलीसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी तपासासाठी दोन लाख रुपये खर्च आला म्हणत तक्रारदार यांच्याकडे पैश्यांची मागणी केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांचा योगायोग...
विशेष म्हणजे, या सर्व प्रकरणात काही योगायोग देखील पाहायला मिळाले आहेत. ज्या गुन्हे शाखेने चोरीचं प्रकरण उघडकीस आणले त्याचे प्रमुख काही दिवसांपूर्वी जिथे गुन्हा दाखल झाला त्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रमुख होते. तर, त्याचवेळी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे विद्यमान प्रमुख हे ज्यांनी गुन्हा उघडकीस आणले त्या गुन्हे शाखेचे त्यावेळी प्रमुख होते. पण हा फक्त योगायोग असल्याचा दावा केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad : महागड्या मोबाईलचे हप्ते फेडण्यासाठी टाकला दरोडा; सिनेमा पाहून बनवला चोरीचा प्लॅन