Aurangabad Crime News : दहा रुपयाच्या वादावरून हत्या; खून केल्यावर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर
Aurangabad Crime News : दहा रुपयांमध्ये दारू मिळते का यावरून वाद सुरु होता.
Aurangabad Crime News : मागील काही दिवसांपासून औरंगाबाद (Aurangabad) शहरातील पुंडलिकनगर गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. सतत एकामागून एक मोठ्या गुन्हे घडताना पाहायला मिळत आहे. गल्ली-गल्लीत आणि चौका-चौकात तथाकथित भाई, भाऊ, दादा टवाळखोरांच्या टोळ्यांनी दहशत निर्माण केली आहे. त्यातच आता आणखी एका घटनेने पुंडलिकनगर हादरलं आहे. दारू पिण्यासाठी दहा रुपये देण्यावरून वाद झाल्याने दारुड्या तरुणाचा खून (Murder) करण्यात आला आहे. शनिवारी रात्री 11.30 वाजता ही घटना समोर आली असून, घटनास्थळी पोलिसांनी तत्काळ धाव घेतली होती. रोहित चौधरी (वय 19 वर्ष) असे आरोपीचे नाव असून, मृताची ओळख पटवण्याचे रात्रीपर्यंत प्रयत्न सुरु होते.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुंडलिकनगर रस्त्यावरील दौलत बंगल्यासमोर रात्री 11 वाजेच्या सुमारास रोहित चौधरी आणि आणखी एका तरुणामध्ये बारसमोर अचानक वाद सुरू झाला. 'दहा रुपयांमध्ये दारू मिळते का?' यावरून त्यांच्यात वाद सुरु होता. वादाचे रुपांतर मोठमोठ्याने शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. तर याचवेळी आरोपी रोहितने नशेत असलेल्या तरुणाला मारहाण सुरु केली. उपस्थित लोकांनी त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहितने जवळील गट्ट उचलून समोरील तरुणाच्या डोक्यात एकामागून एक घाव घातले. त्यामुळे तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळल्यानंतर रोहितने पुन्हा गट्टने त्याचे डोके ठेचले. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
दारू पिण्यासाठी पैसे देण्यावरून झालेल्या वादात आरोपी रोहितने तरुणाचा खून केला. त्या नंतर तो स्वतः पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. तसेच आपण एकाची हत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती कळताच पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या निरीक्षक राजश्री आडे, सहायक निरीक्षक शेषराव खटाणे, उपनिरीक्षक संदीप काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते.
पुंडलिकनगर बनतोय 'क्राईम प्लेस'
मागील काही दिवसांत पुंडलिकनगर गुन्हेगारांचा केंद्र बनला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एक खुनाची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या भागात मागील काही दिवसांत प्रचंड गुन्हेगारी वाढली असल्याचे चित्र आहे. पुंडलिकनगर परिसरात अनेक टोळ्या निर्माण झाल्या असून, नेहमी नशेत असलेले हे तरुण गंभीर गुन्हे करताना पाहायला मिळतात. त्यामुळे या भागात गेल्या काही दिवसांत सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. विशेष म्हणजे, पोलिसांकडून यावर विशेष कारवाई होताना पाहायला मिळत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या :