Adarsh Scam : मंजूर तीन कोटी, खात्यात टाकले सात कोटी; 'आदर्श' घोटाळ्यात असा सुरु होता झोल
Adarsh Scam : अशा एकूण तीन संस्थाना मंजूर झालेल्या कर्जापेक्षा अधिक रक्कम देण्यात आल्याचे समोर आले आहे.
Adarsh Scam : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील आदर्श घोटाळ्यात आता नवनवीन माहिती समोर येत आहे. आदर्श पतसंस्थेत तब्बल 200 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी एसआयटी नेमली आहे. ज्यात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यातल्या त्यात मंजूर कर्ज कमी आणि मात्र खात्यात अधिकची रक्कम जमा केल्याचे लेखापरीक्षणातून समोर आले आहे. अशा एकूण तीन संस्थाना मंजूर झालेल्या कर्जापेक्षा अधिक रक्कम देण्यात आल्याचे समोर आले आहे.
आदर्श समूहातील वेगवेगळ्या दहा संस्थांना कोट्यवधींचे कर्ज दिल्याचे लेखापरीक्षणातून समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, यातील तीन संस्था तर अशा आहेत ज्यांना मंजूर कर्ज कमी आणि त्यांच्या खात्यात अधिकची रक्कम जमा केल्याचे लेखापरीक्षणातून समोर आले. आदर्श बिल्डर अँड डेव्हलपर्स या संस्थेला 3 कोटी 51 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. संचालक मंडळाने त्याला मंजुरी दिली. मात्र, प्रत्यक्षात या संस्थेच्या खात्यात तब्बल 7 कोटी 17 लाख 90 हजार रुपये जमा केल्याचे आढळले आहे. तसेच जयकिसान जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था, मर्यादित करमाड या संस्थेला 9 कोटी 94 लाखांचे कर्ज मंजूर केले अन् प्रत्यक्षात तब्बल 16 कोटी 54 लाख 81 हजार 127 रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. सोबतच आदर्श अप्रतिम गावकरी या संस्थेला 9 कोटींचे कर्ज मंजूर केल्यावर तब्बल 10 कोटी 75 लाख 23 हजार 193 रुपये या संस्थेच्या खात्यात जमा केल्याचे लेखा- परीक्षणातून समोर आले आहे. ही अतिशय धक्कादायक बाब असून या साऱ्या अनियमितता आरोपी अंबादास मानकापे यांच्या सांगण्यावरूनच केल्याचे सांगितले जात आहे.
स्वतःच्याच इतर संस्थांना कोट्यवधींच्या कर्जाची खैरात
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात नियमबाह्य कर्जवाटप करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ओळखीतल्याच लोकांना, स्वतःच्याच इतर संस्थांना कोट्यवधींच्या कर्जाची खैरात वाटल्याचे देखील समोर आले होते. मात्र त्यातल्या त्यात आता मंजूर रक्कमेपेक्षा अधिक रक्कम आपल्याच इतर संस्थांना कर्जाच्या नावाखाली वाटप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ठेवीदारांचे पैसे कर्ज म्हणून आपल्याच इतर संस्थेत फिरवून त्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
आधी तीस-तीस अन् आता 'आदर्श घोटाळा'; वर्षभरात दोन मोठ्या घोटाळ्याने औरंगाबाद हादरलं