Chhatrapati Sambhaji Nagar : गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhaji Nagar : संतापजनक म्हणजे अत्याचार करतानाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्याने एका महिलेला गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुझ्या मुलांचे अपहरण करून पतीला मारहाण करून तुझा संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत आरोपीने 33 वर्षीय विवाहितेला पाण्यात गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटले आहे. संतापजनक म्हणजे अत्याचार करतानाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. मुख्तार खान उर्फ बब्बु (वय 42 वर्ष, रा. नूर कॉलनी, टाऊन हॉल परिसर) असे आरोपीचे नाव असून, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत 33 वर्षीय पीडितेने फिर्याद दिल्यानुसार, टाऊन हॉल भागात राहणारी पीडिता रस्त्याने येत जात असताना आरोपी मुख्तार आक्षेपार्ह कपडे घालून तिला अश्लील हातवारे करायचा. त्याच्याकडे पीडितेने दुर्लक्ष केल्यावर आरोपीने तिचा पाठलाग करायला सुरवात केली. त्यानंतर महिलेला गाठून तिच्या मुलांचे अपहरण व पतीला मारहाण करणे व तिच्याबद्दल चुकीची माहिती देऊन संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. या प्रकाराला कंटाळून विवाहितेला आरोपीने भेटण्यासाठी घरी येण्यास भाग पाडले.
दरम्यान पिडीत महिला जेव्हा घरी आली तेव्हा तिला मुख्तार याने तिला पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकून प्यायला दिले. पाणी पिल्यावर महिला काही वेळाने अचानक बेशुद्ध झाली. त्याच अवस्थेत मुख्तार खानने पीडितेवर अनैसर्गिक अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे अत्याचार करतानाचा व्हिडीओ बनविला. तर पीडिता शुद्धीवर आल्यानंतर या कृत्याबाबत कोणाला काही सांगितले तर तुझा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी दिली.
अन् अखेर पोलीस ठाणे गाठलं
मुख्तारच्या कृत्याने पीडिता प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने याबाबत कुटुंबातील सदस्यांना कोणतीही माहिती दिली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती मानसिकदृष्ट्या खचली असल्याचे पाहून, नातेवाइकांनी तिला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. त्यामुळे मुख्तारच्या धमक्यांना न घाबरता महिलेच्या नातवाईकांनी तिला घेऊन शनिवारी रात्री सिटी चौक पोलिस ठाणे गाठलं. तसेच महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
गुन्हा दाखल होताच मुख्तार फरार...
आरोपी मुख्तार ऊर्फ बब्बू याच्याविरोधात 7 मे रोजी रात्री साडेबारा वाजता गुन्हा दाखल झाला. याची कुणकुण लागताच मुख्तार पसार झाला. दरम्यान, त्याच्या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचा बोर्ड असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते कार्यालयही बंद दिसून आले. विशेष म्हणजे मुख्तार स्वतःला राष्ट्रवादीचा पदाधिकारी म्हणून वावरत होता. तर मुख्तार खान ऊर्फ बब्बू नावाचा आमचा पदाधिकारी नाही. तो कार्यकर्ता असू शकतो. मात्र, त्याला सध्याच्या कार्यकारिणीत कोणतेही पद दिलेले नाही. मागील कार्यकारिणीचे नेमके सांगता येत नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: