(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhaji Nagar News : 'जीव दे अन्यथा मी घेईन'; पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकरणी पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध 16 मे रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पत्नीला लग्नाच्या आठ वर्षांनंतर पतीने 'तू स्वतः मर, नाहीतर मी मारून टाकीन, अशी धमकी दिली होती. त्यानंतर 13 मे रोजी जयभवानीनगर येथे पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली होती. या प्रकरणी पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध 16 मे रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात विनोद विश्वनाथ काळे, दीर विजय काळे, जाऊ नर्मदा विजय काळे, सासरे विश्वनाथ काळे आणि सासू सुमनबाई विश्वनाथ काळे (रा. सर्व जयभवानीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. तर शुभांगी विनोद काळे (वय 26 वर्षे) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
दरम्यान मृत शुभांगीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, शुभांगीचा विनोद काळेसोबत 2015 साली विवाह झाला होता. एकुलती एक मुलगी असल्याने तिच्या आई-वडिलांनी धुमधडाक्यात लग्न लावले होते. तर सासरच्या लोकांनी शुभांगीला सुरुवातीचे काही दिवस चांगले नांदवले. नंतर मात्र तिला त्रास द्यायला सुरुवात केली. शुभांगी हिच्या माहेरच्या मंडळींनी बैठका घेऊन जावयासह त्याच्या आईवडिलांना समजावले होते. शुभांगी ही उच्च शिक्षित होती, ती शहरातील एका हॉस्पिटलध्ये नोकरी करत होती. दरम्यान तिचा पती रात्री उशिरापर्यंत कोणाशी तरी बोलत असल्याने तिने पतीला ही बाब विचारली असता, त्याने तिला मारहाण केली. घटनेच्या दोन दिवस अगोदरही तिला बेदम मारले होते. या सर्व बाबी दोन्ही घरी माहिती होत्या. तर 'तू स्वतः मर, नाहीतर मी मारुन टाकीन, अशी धमकी विनोद काळे याने दिली होती.
दरम्यान 10 मे रोजी शुभांगीला पतीने मारहाण केली. 11 मे रोजी शुभांगीने माहेरी जाऊन हा प्रकार सांगितला. त्यानंतर भावाने विनोद काळेला समजावून सांगितले होते. 13 मे रोजी शुभांगीने वडिलांना फोन केला, तेव्हा ती नैराश्यात होती. वडिलांनी तिची विचारपूस केली. त्यानंतर तिने फोन ठेवून दिला. त्याच दिवशी तासाभरानंतर 11 वाजता तिने बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
भिंतीवर लिहिलेल्या सुसाइड नोटची तपासणी होणार
दरम्यान शुभांगीने आत्महत्या केलेल्या खोलीच्या भितीवर 'माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे' लिहिलेले होते. हे वाक्य शुभांगीने लिहिल्याचे सासरच्या मंडळींचे म्हणणे आहे. त्यामुळे हे लेखन तिचे आहे अथवा नाही, हे तपासण्यासाठी हस्ताक्षरतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Chhatrapati Sambhaji Nagar : आमदाराचा एक फोन अन् एसटी बस हजर; विद्यार्थ्यांची गैरसोय दूर