Aurangabad: आता भाऊ-दादांची खैर नाही, पोलिसांनी बनवली यादी; थेट घरात घुसून करणार कारवाई
Aurangabad Crime News : पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घराची झाडाझडती घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Aurangabad Crime News : मागील काही दिवसात औरंगाबाद (Aurangabad) शहरात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. कुठे गोळीबाराच्या घटना घडतात, तर कुठे गुंडांची दहशत पाहायला मिळतेय. त्यामुळे औरंगाबाद शहर पोलिसांचा (Aurangabad City Police) गुन्हेगारांवरील वचक संपला की काय? असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान, या सर्व घटना पाहता आता अट्टल गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी औरंगाबाद शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घराची झाडाझडती घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यासाठी पोलिसांनी अशा गुन्हेगारांची यादी तयार केली आहे.
औरंगाबाद शहर पोलिसांनी आता गुन्हेगारांवर वाचक ठेवण्यासाठीमोहीम हाती घेतली आहे. यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या टप्प्यात कारवाई करण्याचं नियोजन केलं आहे. तर, यासाठी गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानंतर, पोलीस थेट घरात घुसून अशा गुन्हेगारांची धरपकड करत आहे. तर, पोलिसांच्या याच कारवाईच्या भीतीने अनेक गुन्हेगारांची पळापळ सुरू झाली. विनापरवाना हत्यार, पिस्तूल विक्री करणारे, वापरणाऱ्या 28 गुन्हेगारांच्या घरात शुक्रवारी पोलीस पोहोचले. त्यामुळे पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेनंतर शहरातील गुन्हेगारांच्या मनात दहशत पाहायला मिळत आहे.
मागील काही दिवसांत शहरात खून, लुटमार, गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ मारहाणीत थेट शस्त्रे काढण्यात येत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. परिणामी, शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, शहरातील गुन्हेगारांमधील पोलिसांचा धाक संपला आहे का? असा सवाल केला जात होता. त्यामुळे आता या सर्व घटनांची दखल घेत पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी कडक मोहीम हाती घेतली. तर या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आघाडीच्या 28 जणांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली आहे.
अशी केली जाणार कारवाई...
पोलिसांनी रेकोर्डवरील सर्वच गुन्हेगारांची यादी तयर केली आहे. पोलिसांकडून पहिल्या टप्प्यांत खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण करून लुटमार करणाऱ्या गुन्हेगारांच्या घरात जाऊन तपासणी केली जाणार आहे. तर, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाणे यासाठी संयुक्त मोहीम राबवतील. त्यानंतर, नाहक बॅनरबाजी करणारे, स्वयंघोषित गावगुंड, भाऊ दादांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. तसेच संस्था, ग्रुप, संघटना स्थापन करून त्यांच्यामार्फत गुन्हेगारी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलिसांनी यादी तयार करणे सुरु केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
