अंबादास दानवे-खैरेंच्या 'तू तू मैं मैं' नंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक; अशी झाली चर्चा?
Uddhav Thackeray : विशेष म्हणजे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांना न बोलवता उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेतली आहे.
मुंबई : माजी खासदार तथा ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या संभाजीनगर लोकसभा उमेदवारीवरून झालेल्या 'तू तू मैं मैं' नंतर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर आढावा घेतला आहे. या आढावा बैठकीत संभाजीनगरमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. विशेष म्हणजे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांना न बोलवता उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेतली आहे. तर, लोकसभा उमेदवारीवरून दानवे आणि खैरे यांच्यात सुरु असलेल्या 'तू तू मैं मैं' ची बातमी सर्वात आधी 'एबीपी माझा'ने दाखवली होती.
अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघेही आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यावरूनच दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना चिमटे काढण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमधील 'तू तू मैं मैं' ची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी तात्काळ मंगळवारी मातोश्रीवर छत्रपती संभाजीनगरमधील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत आलेल्या पदाधिकाऱ्यांना लोकसभेचा उमेदवार कोण हवा? खैरे की दानवे? यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक विचारणा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल चंद्रकांत खैरे यांच्या नावावर असल्याची सूत्रांची माहितीआहे.
अशीही चर्चा झाली?
दरम्यान, याच बैठकीत मागील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे, संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरण आणि उमेदवार निवडी संदर्भात संभाजीनगरमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली आहे. त्यामुळे खैरे आणि दानवेंच्या लोकसभा उमेदवारीच्या दाव्यानंतर उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
कोण काय म्हणाले होते?
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोलतांना अंबादास दानवे म्हणाले होते की, "मी शिवसैनिक आहे. पक्षप्रमुख जिथे सांगतील तिथे लढण्याची माझी तयारी आहे. कुठेही लढायला सांगितलं तरी, केवळ निवडणूक नाही, इतर कोणतीही लढाई लढायला सांगितली तरी ती लढाई लढण्याची माझी 100 टक्के तयारी आहे. तसेच, मी मागच्या 10 वर्षांपासून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे." असे अंबादास दानवे म्हणाले आहे.
खैरेंची दानवेंवर टीका...
"अंबादास दानवेंना निवडणूक लढवण्याची इच्छा होती. त्यामुळे गेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला आहे. छत्रपती संभाजीनगरची निवडणूक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील ते लढवणार. होईन ना चांगलं. कशाला काळजी करायची. जनतेची जी इच्छा आहे, ती उद्धव ठाकरे मान्य करतील." असे खैरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: