आता शेवटची संधी, जरांगेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन लागलं कामाला; मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जिल्ह्याजिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन
Maratha Reservation : मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात विषेश कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : पहिल्यांदा 40 दिवसांची संधी दिल्यावर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange) सरकारला मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. सोबतच आता ही शेवटची संधी असणार असल्याचे देखील म्हटले आहे. त्यामुळे सरकारपासून तर जिल्हा पातळीवरील प्रशासनापर्यंत सर्वच कामाला लागले आहेत. मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात विषेश कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील असेच जात प्रमाणपत्र देण्याचे काम सुरु झाले आहे. आतापर्यंत 75 पेक्षा अधिक दाखले वाटप झाले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी सांगितले.
हे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य पुराव्याची तपासणी करण्यासाठी न्या.शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने पुराव्याची वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूल पुरावे. निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे आणि पात्र व्यक्तींना मराठा- कुणबी, कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी समितीच्या निर्देशाने विशेष कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेऊन सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या कक्षामार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपर्यंत 75 पेक्षा अधिक कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे, असे विधाते यांनी सांगितले.
कक्षाची कार्यपद्धती
या जिल्हास्तरीय अधिकारी यांनी विशेष कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय, येथे उपस्थित राहुन विविध विभागांशी समन्वय साधणे, अभिलेखे उपलब्ध करुन घेऊन त्यांची छाननी करणे, कुणबी जातीच्या नोंदी असलेले अभिलेखे वेगळे करुन त्याबाबत विहित नमुन्यातील अहवाल कार्यालयास व समितीस सादर करणे इ.कामे विहित कालमर्यादेत करण्यात येत आहेत. या शिवाय न्यायालयातील जुन्या अभिलेख्यांमध्ये देखील कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, कुणबी असे जातीवाचक उल्लेख असलेले (सन 1967 पुर्वीचे) अभिलेखे उपलब्ध करुन देणे बाबत संबंधित न्यायालयाकडे विनंती करुन अभिलेखे उपलब्ध करुन घेण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 75 पेक्षा अधिक कुणबी - मराठा, मराठा - कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या: