Chandrashekhar Bawankule : कुणीही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये, कृषीमंत्री कोकाटे काही बोलले असतील तर सरकारतर्फे आम्ही क्षमा मागू; चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule : कृषीमंत्री कोकाटे काही बोलले असतील तर शेतकऱ्यांची आम्ही सरकारतर्फे क्षमा मागू. असे मोठे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री मंत्री आणि भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

नागपूर: कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही. पण शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे. मोबदला देण्याबाबत सरकारची जबाबदारी आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देखील देऊ. मात्र कृषीमंत्री (Agriculture Minister) कोकाटे काही बोलले असतील तर शेतकऱ्यांची आम्ही सरकारतर्फे क्षमा मागू. असे मोठे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री मंत्री आणि भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं आहे.
राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. त्यात विदर्भ, अमरावती विभागाचे जे नुकसान झाले त्या नुकसानीचा बैठक आणि पंचनामा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यातील एकही शेतकरी सुटू नये, अशा सूचना दिल्या आहेत. सर्वेक्षण सुरू झालं आहे, महाराष्ट्रात एकाही शेतकऱ्याचा सर्वेक्षण सुटणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत, असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे करून नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देऊ, असेही ते म्हणाले.
आम्हाला उबाठाच्या लोकांना विचारण्याची गरज नाही- बावनकुळे
शेतकऱ्यांसाठी जे डिमांड पाठवावे लागतात, ते डिमांड सरकारला आम्ही पाठवतो. सोबतच मध्यवर्ती कारागृह नागपूर शहराबाहेर नेण्यासाठी बैठक घेतोय, प्रधानमंत्री आवास योजना अशा विविध बैठका आहेत अशी माहिती ही महसूलमंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली. आम्हाला उबाठाच्या लोकांना विचारण्याची गरज नाही. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. एनडीए स्पष्ट बहुमतात आहे. आम्हाला उबाठाकडे जाण्याची अजिबात गरज नाही. अनेक नेते आज ठाकरे सेना सोडत आहेत. वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी बेइमानी करणे आहे. जी मते उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत घेतली त्याच्याशी बेमानी केली आहे, मुंबईमधील मतं मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतलेलं हे पाऊल आहे. अशी टीका ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
वडेट्टीवार यांनी जे आरोप केले ते बालिशपणाचे - चंद्रशेखर बावनकुळे
पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाला पाठबळ कोणाचं आहे? त्याना सत्ताधाऱ्यांचे पाठबळ आहे.सरकारी जमिनीवर उभा झालेलं हे हॉस्पिटल आहे. त्यांना फटके मारले पाहिजे, डॉक्टरांना फटके मारले पाहिजे. हॉस्पिटलला कुलूप लावले पाहिजे. आम्ही हे प्रकरण सोडणार नाही. अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. यावर उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, वडेट्टीवार यांनी जे आरोप केले ते बालिशपणाचे आहेत, त्यांनी जबाबदारीपणे बोलला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. मुख्यमंत्री यावर बोलले आहात, मी पुण्यात होतो कारवाई झाले पाहिजे, भाजपच्या महिला मोर्चाने आंदोलन केलंय. पुण्यातल्या घटनेची चौकशी होणार असून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची सरकारची भूमिका असल्याचे ही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल- चंद्रशेखर बावनकुळे
आम्ही कडक कारवाई करू आणि यानंतर कुठलाही हॉस्पिटल राज्यात असे काम करणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. भविष्यात असं कुठल्याही हॉस्पिटल ने केलं तर त्याचा परवाना रद्द केला पाहिजे, जे कायदे आहेत त्या कायद्याच्या सर्व कारवाया करू, लोकांच्या जीवाशी हॉस्पिटल ने खेळू नये असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
आणखी वाचा
























