Nashik News : कुंभमेळा नामकरणाच्या वादानंतर नाशिकमध्ये नवा वाद उफाळला, 'मोदी मैदाना'वरून शरद पवार गट आक्रमक, केली मोठी मागणी
Nashik News : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असतानाच आता नाशिकमध्ये नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nashik News : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा 2027 साली (Kumbh Mela 2027) होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी आत्तापासूनच सुरु झाली आहे. मात्र त्याआधीच नामकरण आणि शाही स्नानाच्या अधिकारावरून साधू-संतांमध्ये मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून आले. आता नाशिकमध्ये (Nashik News) पुन्हा एकदा नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण नाशिकच्या मोदी मैदानाचे नामांतर करावे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (NCP Sharad Pawar Faction) करण्यात आली आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिक कुंभमेळा न म्हणता नाशिक-त्र्यंबकेश्वर असं नाव सर्व ठिकाणी दिलं जाईल असा निर्णय घेतल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. यानंतर नामांतराचा वाद काही अंशी निवळल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या मागणीने नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या मोदी मैदानाचे नामांतर करावे
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन येथील मैदानाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीचे नाव न देता त्या मैदानाचे कुंभमेळा मैदान म्हणून कायमस्वरुपी नामकरण करावे. तसेच या नावाचा फलक देखील लावण्यात यावा. जेणेकरुन कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटक व यात्रेकरुंना समजेल की या ठिकाणापासून कुंभमेळ्याला दरवर्षी सुरुवात होते, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांना देण्यात आले आहे. महापालिकेने त्या ठिकाणी साधूग्राम नावाचा फलक उभारला नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करून फलक उभारेल. तर विधिवत पूजा विधी करून त्याचा नामांतर करेल, असा इशारा राष्टवादी शरद पवार गटाकडून देण्यात आला आहे.
कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार : गिरीश महाजन
दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या नियोजनासंदर्भात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत साधू महंतांसोबत काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली होती. प्रयागराजमधील गर्दी बघितल्यावर इथे 3 ते 4 पट गर्दी होईल. कुठे दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घेत आहोत. मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. लाखो भाविक कुशावर्तमध्ये स्नान करण्यासाठी येतात. पण तिथली जागा खूप छोटी आहे. गर्दी बघता तिथे स्नान करणे शक्य नाही. साधूंचे स्नान करण्यासाठी कुशावर्त तीर्थासारखे पवित्र कुंड तयार करणार आहे. दीड वर्षात तिथे नवीन कुंड तयार केला जाणार आहे, अशी त्यांनी यावेळी केली होती.
आणखी वाचा























