(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Telangana : तेलंगणा निवडणूक प्रचाराचा महाराष्ट्रात धुरळा, चंद्रपुरातील 14 गावांतील 4 हजार मतदार करणार तेलंगणात मतदान
Telangana Assembly Election : तेलंगणा राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार चंद्रपुरातील 14 गावात सुरू असून या गावांतील नागरिक तेलंगणातील असिफाबाद मतदारसंघात मतदान करणार आहेत.
चंद्रपूर : आपल्या शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक (Telangana Assembly Election) होत आहे. 119 जागासाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी तेलंगणा राज्यात जोरदार प्रचारदेखील सुरू आहे. तेलंगणा निवडणुकीच्या प्रचाराचा हा धुरळा आपल्या महाराष्ट्रातदेखील उडाल्याचं सांगितलं तर आश्चर्य वाटेल. मात्र हे खरं आहे. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरच्या चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या 14 गावात तेलंगणा विधानसभेचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे.
दोन्ही राज्यातील निवडणुकीत मतदान करतात
चंद्रपुरातील 14 गावातील जवळपास 4 हजार मतदार तेलंगणा राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आसिफाबाद या मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर जिवती (Chandrapur Jiwati Taluka) तालुका आहे. या तालुक्यातील 14 गावांवर महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकार आपापला अधिकार सांगत आहेत. या गावातील नागरिकांकडे दोन्ही राज्यातील मतदार ओळखपत्र आहे. इथले मतदार महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यातील निवडणुकीत मतदान करतात.
महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगनाकडून जास्त विकासकामं
महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत तेलंगणा सरकारने या गावात अधिक विकासात्मक कामे केली आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांचा कल तेलंगणा राज्याकडे अधिक आहे. या गावांची प्रमुख मागणी वन जमिनीचे पट्टे मिळण्याबाबत असून जमिनीचे पट्टे देण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. तर दुसरीकडे तेलंगणा सरकारने जमिनीचे पट्टे वाटप केले आहेत.
मुकादमगुडा, परमडोली, महाराजगुडा, शंकरलोधी यासारखी 14 गावं तेलंगाणा राज्यात मतदान करणार आहेत. तर दुसरीकडे या सर्व अनागोंदी कारभाराला महाराष्ट्र सरकारच दोषी असल्याचा आरोप या भागातल्या महाराष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला.
गेल्या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या?
तेलंगणातील 2018 च्या विधानसभा निवडणुकीत KCR यांच्या BRS (तत्कालीन TRS) ला बहुमत मिळाले. BRS ने 119 पैकी 88 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसच्या 19 जागा कमी झाल्या.
याशिवाय असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनने (एआयएमआयएम) सात जागा जिंकल्या होत्या. भाजपला केवळ एक जागा मिळाली होती. तुम्हाला सांगतो की, सध्या राज्यात KCR यांच्या नेतृत्वाखाली BRS सरकार आहे.
दरम्यान, तेलंगणामध्ये विजय मिळवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे अनेक नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. शुक्रवारी, 27 ऑक्टोबर रोजी बीआरएसच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये माजी मंत्री मोतुपल्ली नरसिंहुलू, माजी खासदार कोमातीरेड्डी राजगोपाल रेड्डी, माजी आमदार एनुगु रवींद्र रेड्डी, माजी आमदार नेथी विद्यासागर, माजी आमदार संतोष कुमार, माजी आमदार अकुला ललिता, माजी आमदार कपिलवाई दिलीप कुमार आणि नीलम मधु यांचा समावेश आहे.
ही बातमी वाचा: