Chandrapur News : धक्कादायक! पिकअप चालकाची मुजोरी; चक्क टोल नाका कर्मचाऱ्याच्या अंगावर घतली गाडी, अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद
Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात पिकअप चालकाने चक्क टोल नाका कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालत त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला आहे.

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात पिकअप चालकाने चक्क टोल नाका कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालत त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. बल्लारपूर (Ballarpur) शहरा जवळील टोल नाक्यावरील आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत संजय वांढरे (34) हा टोल नाका कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर हा संपूर्ण प्रकार या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र हे कृत्य केल्यानंतर मुजोर पिक अप चालकाने घटना स्थळावरुन पळ काढला आहे.
टोल नाका वाचवून पळत असताना घडला प्रकार
पुढे आलेल्या माहितीनुसार, संजय वांढरे हे बल्लारपूर शहरातील गांधीवाढ परिसरातील रहिवासी आहेत. या घटनेत ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर चंद्रपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, टोल नाका वाचवून ही गाडी पळत असताना टोल कर्मचाऱ्याने गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार घडल्याचे बोललं जात आहे. यात निष्ठुर गाडी चालकाने कर्मचाऱ्याच्या अंगावर चक्क गाडी घालत चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार पिक अप चालकाचाही शोध घेतला जात आहे.
मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची भर चौकात एका इसमाला मारहाण
चक्क पोलीस कर्मचाऱ्यांचे छत्तीसगढ राज्यातील एका इसमाला बेदम मारहाण केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील डूग्गीपार पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेला कांचन राहुले हा पोलीस कर्मचारी रस्त्याने जात असताना छत्तीसगड राज्यातील सुनीतकुमार मडावी याने कट मारून ओव्हरटेक केल्याच्या आरोप करून त्याला बेदम मारहाण केली. सदर घटना ही 19 मे 2025 रोजी घडली. त्यानंतर सुनीतकुमार मडावी याने पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. यावर गोंदिया पोलिसांनी संबंधित पोलिसाला निलंबित केलं असून सदर पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती देखील पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत. तर पोलीस कर्मचाऱ्याने मला चुकीच्या पद्धतीने मारहाण केली आणि आता हा व्हिडिओ समाज माध्यमावर झाल्यामुळे माझी प्रतिष्ठा समाजामध्ये मलीन झाल्याचा आरोप करीत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीतून बळतर्फ करावं, अशी मागणी सुनीतकुमार मडावी याने पोलीस विभागाकडे केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























