एक्स्प्लोर
Advertisement
'चॅम्पियन स्मिथ' परतलाय...
बॉल टॅम्परिंग प्रकरणातल्या बंदीच्या शिक्षेनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचं कसोटीत यशस्वी पुनरागमन
माणूस आपल्या आयुष्यात अनेकवेळा चुकतो. पण त्याला त्या चुकीतून सुधरण्याची एक संधी नक्की मिळते. काहीजण ती संधी गमावतात आणि रसातळाला जातात पण काहीजण त्या संधीचं सोनं करतात. गेल्या वर्षी केपटाऊन कसोटीत बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथला देखील नशीबानं अशी संधी दिली आणि स्मिथनं त्या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं केलं आणि तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानात चॅम्पियन ठरला.
अॅशेस मालिकेतल्या पहिल्याच एजबॅस्टन कसोटीत यजमान इंग्लंडनं कांगारुंना कोंडीत पकडलं होतं. पण स्मिथनं दोन्ही डावांत शतकं ठोकून इंग्लिश आक्रमणाचा नेटानं सामना केला. त्याच्या या झुंजार खेळीचं बक्षीस म्हणजे कांगारुंना 251 धावांनी मिळालेला भला मोठा विजय. या विजयानं कांगारुंना मालिकेत आघाडी मिळवून दिली आणि स्मिथला चाहत्यांच्या मनात पुन्हा स्थान.
स्मिथच्या एजबॅस्टन कसोटीतल्या दोन्ही खेळींचं वर्णन करायचं तर, तो आला.... तो खेळला... तो वीरासारखा लढला... त्यानं कांगारुंना संकटाच्या खाईतून वर काढलं आणि एक संस्मरणीय विजयही मिळवून दिला...असंच काहीसं म्हणावं लागेल.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार असलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत बॉल टॅम्परिंगच्या अक्षम्य गुन्ह्याची नोंद झाली. तो दोषी आढळला. आणि त्याच्यावर एका वर्षांची बंदी घातली गेली. सध्याच्या घडीला जगातल्या सर्वोत्तम चार फलंदाजांपैकी एक असलेला हा महारथी त्याक्षणी ढसाढसा रडला. त्यानंतर आपण पुन्हा मैदानात उतरु की नाही हेदेखील त्याला माहित नव्हतं.
पण स्मिथनं केपटाऊन कसोटीनंतर तब्बल एक वर्ष आणि चार महिन्यांनी कसोटी खेळण्यासाठी एजबॅस्टनच्या मैदानात पाऊल ठेवलं. त्यावेळी काही इंग्लिश प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवली. त्याला सॅन्डपेपर दाखवले गेले. पण याच प्रेक्षकांसमोर सलग दोन्ही डावात शतक ठोकून स्मिथनं यशस्वी पुनरागमन केलं. अॅशेसच्या गेल्या दहा डावांतलं त्याचं हे सहावं शतक ठरलं. या मागच्या दहा डावांत त्यानं 139.35 च्या सरासरीनं तब्बल 1 हजार 116 धावांचा रतीब घातला आहे. एक फलंदाज म्हणून स्मिथ ग्रेट का आहे याचं उत्तर त्याच्या या कामगिरीतूनच झळकतंय.
बॉल टॅम्परिंगनं कारकीर्दीला लावलेला काळा डाग, त्यानंतर झालेली एका वर्षांची बंदी, आंतरराष्ट्रीय स्तरातून झालेली प्रचंड टीका, चाहत्यांचा रोष आणि मानसिक दबाव ही परिस्थिती खरंतर एखाद्या खेळाडूची कारकीर्द संपवण्यासाठी पुरेशा होत्या. पण या सगळ्या कठीण परिस्थितीला स्मिथ धीरानं सामोरा गेला. बंदीच्या काळात स्मिथनं स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर आयपीएलमध्ये त्यानं उत्तम कामगिरी बजावली. इंग्लंडमधल्या विश्वचषकातही त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी होती.
क्रिकेटविश्वात स्मिथसारखी बंदीची शिक्षा भोगून यशस्वी पुनरागमन केलेले खेळाडू हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. शेन वॉर्न, मार्लन सॅम्युएल्स, मोहम्मद आमीर, हर्षल गिब्ज ही त्यापैकी काही नावं. पण स्मिथचं कर्तृत्व या सर्वांपेक्षा काहीसं वेगळं आहे.
क्रिकेटच्या मैदानात ऑस्ट्रेलियन्स त्यांच्या जिद्दीसाठी, चिकाटीसाठी ओळखले जातात. त्याच जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर स्टीव्ह स्मिथ नावाचा तारा आज पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकताना दिसतोय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement