Raksha Bandhan 2022 : रक्षाबंधनाला बुलढाण्यातील 'या' गावातील कोणतीही बहिण भावाला राखी बांधत नाही!
Buldhana Raksha Bandhan Special : बुलढाण्यातील एका गावात कोणतीच बहिण आपल्या भावाला राखी बांधत नाही. तब्बल 332 वर्षांपासून ही प्रथा चालत आली आहे. पण बहिण भावाला राखी का बांधत नाही यामागे एक कारण आहे.
Buldhana Raksha Bandhan Special : आज श्रावणी पौर्णिमा... अर्थात रक्षाबंधन... (Raksha Bandhan) बहिण-भावाच्या अतुट नात्याचा, प्रेमाचा दिवस. बहिणी आपल्या भावाला राखी (Rakhi) बांधून, भावाला गोड पदार्थ भरवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज देशभरात कोणत्याही रक्षबंधनाचा सण साजरा होत असताना, बुलढाण्यातील (Buldhana) एका गावात रक्षाबंधन साजरा करण्यात येत नाही. या गावात कोणतीच बहिण आपल्या भावाला राखी बांधत नाही. तब्बल 332 वर्षांपासून ही प्रथा चालत आली आहे. पण बहिण भावाला राखी का बांधत नाही यामागे एक कारण आहे.
वानखेडे गावात 332 वर्षांपासून रक्षबंधन साजरी होत नाही
बुलढाणा जिल्ह्यात वानखेड नावाचं गाव आहे. जेमतेम सात हजार लोकसंख्या असलेलं हे गाव. या गावात पालिवाल समाज मोठ्या प्रमाणात आहे. आजपासून तब्बल 332 वर्षांपूर्वी राजस्थानच्या पाली राज्यातून हा समाज व्यवसायानिमित्त या गावात वास्तव्यास आला आणि तेव्हापासून इकडेच आहे. 332 वर्षांपूर्वी पाली राज्यावर मोहम्मद गझनी नावाच्या मुस्लीम शासकाने हल्ला केला होता आणि त्या राज्यात मोठा नरसंहार झाला होता. प्रचंड जीवितहानी झाली होती. पाली राज्यातून अनेक नागरिकांनी देशाच्या इतर भागात पलायन केलं होतं आणि तो दिवस होता श्रावणी पौर्णिमेचा.
पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करुन 'एकता दिन' पाळला जातो
1690 च्या दरम्यान राजस्थानच्या पाली राज्यात मोठ्या प्रमाणात ब्राह्मण समाज वास्तव्यास होता. शांत आणि वैभव संपन्न असा हा समाज असल्याने मुघल राजांची या समाजावर नजर पडली आणि 1690 च्या दरम्यान या पाली राज्यावर मुघल राजा मोहम्मद गझनीने हल्ला केला. या आक्रमणात हजारो नागरिकांची हत्या झाली. त्यामुळे या परिसरातील पालिवाल ब्राह्मण समाज नंतर व्यवसायानिमित्त देशभर विखुरला गेला आणि अजूनही आपल्या व्यवसायावर हा समाज उदरनिर्वाह करतो. 332 वर्षांपूर्वी श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी आपले हजारो वंशज मारले गेल्याने या समाजाकडून रक्षाबंधन साजरं न करता गावातील पालिवाल समाजाचे लोक दरवर्षी एका मंदिरात जमतात व आपल्या पूर्वजांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करुन "एकता दिन" म्हणून साजरा करतात. या दिवशी गावातील एकही बहिण आपल्या भावाला राखी बांधत नाही किंवा घरात गोडधोड पदार्थ बनवत नाही. हा सण मोहम्मद गझनीच्या निषेधार्ह दिन म्हणून ही पाळला जातो.
भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन. देशभरात सगळीकडे या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहेत. परंतु इतिहासातील अनेक घटनांनी कुणाचं जीवन कसं बदललं आहे हे यावरुन दिसून येत. संपूर्ण जगात भावा-बहिणीच्या प्रेमाचा दिवस कुठे मोठ्या उत्साहात साजरा होतो तर कुठे आपल्या पूर्वजांच्या आठवणीत साजरा होतो.