बुलढाण्यातील रुग्णालयात रुग्णांभोवती चक्क डुकरांचा अधिवास; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील भीषण वास्तव
Buldhana News : बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्वच्छता व डुकरांच्या मुक्तसंचारामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा रुग्णभरती असलेल्या वार्डमध्ये डुक्कर आराम करताना दिसतात.
बुलढाणा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (Buldhana District Hospital) अस्वच्छता व डुकरांच्या मुक्त संचारामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा रुग्णभरती असलेल्या वार्डमध्ये डुक्कर आणि कुत्रे आराम करताना दिसत आहे. केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्याच जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सामान्य रुग्णालयात हे भीषण वास्तव समोर आले आहे.
बुलढाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या अवतीभोवती चक्क डुकरांचा व कुत्र्यांचा अधिवास असल्याचे दिसून आले आहे. तर रुग्णालय परिसरात इतकी अस्वच्छता आहे की, दुर्गंधीमुळे या रुग्णालयात रुग्णही यायला नकार देत आहेत. विशेष म्हणजे या रुग्णालयात पन्नासहून अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांची फौज आहे. तरीही या ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांचे मौन
अनेकदा रुग्ण भरती असलेल्या वार्डमध्ये व खोल्यांमध्ये चक्क डुक्कर आणि कुत्रे बेडवर आराम करताना दिसतात. मात्र याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सकांना विचारलं असता ते बोलण्यास तयार नाहीत. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयाचे असे हाल असतील तर इतर ठिकाणी काय अवस्था असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रुग्णांच्या आरोग्याशी खेळ
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णालयाचा दर्जा खालावत असल्याने तसेच सोयीसुविधांचा अभाव असल्याने जिल्ह्याभरातील ग्रामीण व गरीब रुग्णांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. सर्वत्र पसरलेला कचरा व दुर्गंधी यामुळे रुग्णांना त्यामुळे अनेक विकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचे दिसून येत आहे.
अनेकदा रुग्णांवर डुकरांचा हल्ला
रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गरीब रुग्णाला सोयी सुविधेसह चांगल्या दर्जाचे उपचार मिळणं अपेक्षित असते. मात्र गरीब जनता डूकरांच्या सानिध्यात राहून उपचार घेत आहेत. अनेकदा वृद्ध रुग्णावर किंवा रुग्णाच्या नातेवाइकांवर डुकरांनी हल्ला केल्याच्याही घटना रुग्णालय परिसरात घडल्या आहेत. मात्र याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. आता हा प्रश्न केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव कसा सोडवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या