Raksha Khadse : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
Raksha Khadse : विधानपरिषदेत गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. आता रक्षा खडसे यांनी गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.
Raksha Khadse : मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अलीकडेच विधानपरिषदेत गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळाले. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्याकडे निर्देश करत सदरे नावाच्या पीआयने आत्महत्या कुणामुळे केली हे स्पष्ट करण्याची मागणी केली. तर वाळू माफिया, अवैध उत्खनन केल्याचा गंभीर आरोप त्यांनी खडसेंवर केला. तर खडसेंनी देखील जळगाव जिल्ह्यात वाळू उपसा आणि अवैध धंदे महाजन यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप केला. यानंतर आता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या एकत्र येण्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय.
लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. मात्र अनेक दिवसांपासून त्यांचा भाजप प्रवेश रखडला होता. यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये (BJP) जे पी नड्डा (J P Nadda) यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला होता, तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता. मात्र गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोध केल्याने तो जाहीर झाला नाही, असे त्यांनी म्हटले होते. गणपतीनंतर एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तर दुसरीकडे रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य केले होते. यामुळे दोन्ही नेते एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, एकनाथ खडसे यांचा पक्ष प्रवेश होत नसल्याने त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणार असल्याचे जाहीर केले. यानंतर विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे खडसे-महाजन एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.
दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवणार : रक्षा खडसे
आता नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या पुन्हा एकदा खडाजंगी झाली. याबाबत रक्षा खडसेंना विचारले असता त्या म्हणाल्या की, मी मागेही याबाबत बोललेली आहे. नाथाभाऊ आणि गिरीश महाजन हे दोघेही माझ्यासाठी अत्यंत जवळचे आहे. नाथाभाऊ परिवारातले आहे आणि गिरीश भाऊ आमचे नेते आहेत. गिरीश भाऊंनी माझ्यावर मुलीसारखे प्रेम केले आहे. त्यामुळे वाईट वाटते, पण शेवटी दोघेही सिनियर आहेत, काही गोष्टी बोलायला मला देखील मर्यादा आहेत. पण मी दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवणार आहे. त्याला यश कधी येते ते बघू, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा