Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावात पोहोचले. अनेक मंत्री सुद्धा मतदारसंघात परतले असून ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.
Maharashtra Cabinet Portfolio : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सहा दिवसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटप केले. मुख्यमंत्र्यांनी गृह मंत्रालयासह पाच खाती स्वत:कडे ठेवली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्यासह तीन विभाग आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्काची जबाबदारी देण्यात आली आहे. 15 डिसेंबर रोजी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप शनिवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आले. खातेवाटप झाल्यानंतर बहुसंख्य मंत्र्यांनी मतदारसंघात जाणे पसंत केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावात पोहोचले. अनेक मंत्री सुद्धा मतदारसंघात परतले असून ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.
दरम्यान, उपमख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या मूळ गावी आले आहेत. त्याच्या सोबत खासदार श्रीकांत शिदे हेदेखील दरे गावी पोहोचले आहेत. गावातील हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. शिंदेंचा हा दौरा तीन दिवसाचा असून या दरम्यान ते पूर्णपणे विश्रांती घेणार असल्याचं त्यांच्या निकवर्तीयांकडून सांगितलं जात आहे.
लवकरच सर्वजण कामाला लागतील
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार देखील आपल्या बारामती मतदारसंघात परतले आहेत. आज पहाटेपासून बारामती मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. वेगवेगळ्या कामांचा पाहणी केली. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत जाहीर नागरी सत्कार होणार आहे. त्याचबरोबर त्यांनी बारामती तालुक्यातील रुई येथील एका ज्वेलर्सच्या उद्घाटना हजेरी लावली. यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या दोन महिन्यांमध्ये आचारसंहितेमुळे बरीच कामे पडली आहे, ती पुन्हा सुरू करायची आहेत. काल खाते वाटप झालं आहे. लवकरच सर्वजण कामाला लागतील असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ यांचा फोटो गायब
दरम्यान, सिन्नर विधानसभेचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांची कृषीमंत्रीपदी वर्णी लागली आहे. मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून नाशिकमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र हेच बॅनर आता चर्चेचा विषय ठरले आहेत. कारण माणिकराव कोकाटे यांच्या स्वागताच्या बॅनरवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा फोटो गायब आहे. तर भुजबळांचे कट्टर विरोधक असलेले आमदार सुहास कांदे यांचा फोटो बॅनरवर झळकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पुण्याचे पालकमंत्री कोणतेही दादा झाले तरी मला आनंदच
पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भाष्य केलं आहे. पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काल त्या पहिल्यांदा पुण्यात आल्या. त्यांचं पुणे विमानतळावर कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, पुण्याचे पालकमंत्री कोणतेही दादा झाले तरी मला आनंदच आहे. मी दोन्ही दादांचं काम पाहिलं आहे. दोन्ही दादांनी नेहमी मला मदत केली, असं वक्तव्य माधुरी मिसाळ यांनी केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या