Maharashtra Assembly Elections 2024 : मलकापूर विधानसभेत चैनसुख संचेतींच्या अडचणीत वाढ, भाजपच्याच नेत्यांचा टोकाचा विरोध, नेमकं कारण काय?
Malkapur Assembly Constituency : मलकापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती यांना भाजपाच्याच नेत्यांनी टोकाचा विरोध केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
बुलढाणा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections 2024) चे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहे. आता मलकापूर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला भाजपाच्या नेत्यांचा टोकाचा विरोध केला आहे. त्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते व मलकापूर विधानसभेतील इच्छुक उमेदवार चैनसुख संचेती (Chainsukh Sancheti) यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात चर्चिला जाणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे मलकापूर विधानसभा मतदारसंघ (Malkapur Assembly Constituency) आहे. या मतदारसंघात स्वातंत्र्यानंतर भाजपचच वर्चस्व राहिलेल आहे. गेल्या चार वेळेस या मतदारसंघातून आमदार राहिलेले चैनसुख संचेती हे भाजपचे जेष्ठ नेते आहेत आणि यावेळेस या मतदारसंघातून प्रबळ दावेदार आणि इच्छुक उमेदवार आहेत. मात्र त्यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. कारण भाजपच्या नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध दंड थोपटले आहे. चैनसुख संचेती अध्यक्ष असलेल्या मलकापूर अर्बन बँकेच्या अडचणी, कृषी उत्पन्न बाजार समितीतील अविश्वास ठराव आणि चैनसुख संचेती यांनी मलकापूर शहरात केलेले अतिक्रमण हे सर्व विषय घेऊन आता भाजपचेच नेते चैनसुख संचेती यांच्या विरोधात मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
शिवचंद्र पाटलांचा चैनसुख संचेतींवर हल्लाबोल
याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते शिवचंद्र पाटील म्हणाले की, माझ्या पत्नीसाठी मी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. मलकापूर मतदारसंघात बहुजनांचा लोकप्रतिनिधी असावा अशी जनभावना आहे. चैनसुख संचेती यांनी मलकापूर अर्बन बँकेच्या माध्यमातून लाखो लोकांच्या कोट्यवधीच्या ठेवी बुडवल्यात, अशा भ्रष्टाचारी माणसाला लोक मतदान करणार नाहीत. चैनसुख संचेती हा बेशरम माणूस लोकांचे पैसे बुडवून लोकांकडे उघड माथ्याने मत मागायला जातो.
पराभव झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही
पक्षाने चैनसुख संचेती यांना उमेदवारी दिल्यास आम्ही पक्षाचे काम करणार नाही. भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यास त्याला कार्यकर्ते व आम्ही जबाबदार राहणार नाहीत. त्याला पक्षाचे वरिष्ठ जबाबदार राहतील. चैनसुख संचेती हा हुकूमशहा माणूस आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख हे चेनसुख संचेती यांच्या ताटाखालचे मांजर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थापन केलेल्या चैनसुख संचेती यांच्या शिक्षण संस्थेत ते कर्मचाऱ्यांना नोकरी लावायचे 25 ते 35 लाख रुपये घेतात. चैनसुख संचेती यांनी जिल्ह्यातील एकमेव असलेल्या भाजपच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर अविश्वास ठराव आणला. त्यामुळे शेतकरी त्यांच्यावर नाराज आहेत. चैनसुख संचेती हा भ्रष्टाचारी माणूस आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ नये. याउलट मी स्वतंत्रपणे निवडून येणार, असे शिवचंद्र पाटील म्हणाले.
आणखी वाचा