मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
Mumbai: मुंबईतील घर खरेदीदारांमध्ये मोठ्या आणि प्रशस्त अपार्टमेंट्सकडे झुकलेला कल दिसून येत आहे.
Mumbai: मुंबईत स्वत:चं घर घ्यायचं म्हणजे किमती ऐकूनच घाम फुटेल. पण यंदा मुंबईकरांच्या घरखरेदीत यंदा मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्के अधिक नोंद झाली आहे. विशेष म्हणजे,मुंबईकरांची 2 कोटी रुपयांच्या घरांना पसंती असल्याचं समोर आलंय. चार लोकांसाठी ही घरे समाधानकारक असल्यानं दोन ते तीन बीएचके फ्लॅट घेण्याकडे मुंबईकरांचा ओढा आहे. बांधकाम क्षेत्रात नाईट फ्रँक कंपनीच्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आलाय. यात 2024 मध्ये आतापर्यंत मुंबईत आतापर्यंत 1 लाख 28 हजार घरांची विक्री झाली आहे.यापैकी 1 लाख 1 हजार घरांची किंमत दोन ते पाच कोटींच्या घरात आहे.
मुंबईतील पश्चिम उपनगरात मालमत्ता खरेदीची संख्या उच्चांकी असून मध्य आणि दक्षिण मुंबईतही मागणी झपाट्याने वाढत आहे. नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये मध्य उपनगरातील नोंदणीकृत मालमत्तांची संख्या नोव्हेंबर 2023 मधील 29% वरून 31% पर्यंत वाढली आहे. दक्षिण मुंबईतही ही संख्या 7% वरून 9% झाली आहे. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे या भागांतील वाढता पुरवठा आणि घर खरेदीदारांकडून मिळणारा चांगला प्रतिसाद.
मुंबई मध्यमध्ये घरखरेदीत वाढ
मुंबईतील विविध भागांचा कल पाहता, दहिसर ते वांद्रे हा पश्चिम उपनगर म्हणून ओळखला जातो. माहीम ते महालक्ष्मी हा मध्य मुंबईचा भाग आहे, तर मुंबई सेंट्रल ते कफ परेड दक्षिण मुंबईत येते. याशिवाय, कुर्ला ते मुलुंड हा भाग मध्य उपनगर म्हणून ओळखला जातो.मध्य आणि दक्षिण मुंबईत पुरवठा वाढल्याने खरेदीदारांची घरखरेदीकडे कल कायम आहे. मात्र, पश्चिम उपनगरांतील थोडीशी घट ही तुलनेने अधिक स्पर्धेमुळे असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मोठ्या अपार्टमेंटकडे मुंबईकरांचं लक्ष, प्रशस्त घरांना पसंती
मुंबईतील घर खरेदीदारांमध्ये मोठ्या आणि प्रशस्त अपार्टमेंट्सकडे झुकलेला कल दिसून येत आहे. नाइट फ्रँक इंडियाच्या डेटानुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये 1,000 ते 2,000 चौरस फुटांच्या अपार्टमेंट्सचा वाटा 8% वरून 14% पर्यंत वाढला आहे, तर 2,000 चौरस फुटांपेक्षा जास्त आकाराच्या घरांचा वाटा 2% वरून 5% पर्यंत वाढला आहे. याउलट, 500 चौरस फुटांपर्यंतच्या लहान युनिट्समध्ये मोठी घट झाली असून, त्यांच्या नोंदणीचा वाटा 47% वरून 33% पर्यंत घसरला आहे. मात्र, 500 ते 1,000 चौरस फुटांचे अपार्टमेंट्स अजूनही खरेदीदारांमध्ये लोकप्रिय असून, सर्व नोंदणीकृत व्यवहारांपैकी 48% वाटा त्यांचा आहे.आर्थिक स्थैर्य, जीवनशैलीतील बदल, आणि प्रशस्त घरांची मागणी यामुळे मुंबईतील घर खरेदीदारांना मोठ्या अपार्टमेंट्समध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. यामुळे गृहनिर्माण बाजारपेठ अधिक सक्षम आणि स्थिर होत असल्याचे तज्ञ सांगतायत.