Ajit Pawar: जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात? आयकर विभागाने अजित पवारांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानियांचं टीकास्त्र
Ajit Pawar properties worth rs 1000 crore release by Income Tax: आयकर खात्याने अजितदादांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवली, अंजली दमानिया म्हणाल्या, म्हणून ते “मी तर शपथ घेणार” म्हणाले.
मुंबई: राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी नव्या सरकारचा पायगुण चांगलाच फलदायी ठरला आहे. आयकर विभागाने 2021 मध्ये अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची जप्त केलेल्या 1000 कोटींच्या मालमत्तेवरील टाच उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही मालमत्ता पुन्हा पवार कुटुंबीयांना लवकरच सुपूर्द केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यासंदर्भात अंजली दमानिया शनिवारी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन आणखी सविस्तरपणे भाष्यही करणार आहेत.
अंजली दमानिया यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये दमानिया यांनी म्हटले आहे की, शाब्बास! 1000 कोटी ? भाजपला पाठिंबा द्या, उपमुख्यमंत्रिपद घ्या आणि जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात ? 5 तारखेला शपथ विधी आणि ही घ्या 1000 कोटीची ऑर्डर ? आता मला कळले की 4 तारखेला फडणवीस - शिंदे आणि अजित पवारांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये “मी तर शपथ घेणार” असे अजित पवारांनी का म्हटले?, असे दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर आता अजित पवार काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.
५ तारखेला शपथ विधी आणि ५ तारखेला १००० कोटीची ऑर्डर ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 7, 2024
ही ती ऑर्डर
आता मला कळले की ४ तारखेला फडणवीस - शिंदे आणि अजित पवारांनी जी प्रेस कांफ्रेंस घेतली त्या प्रेस मधे
“मी तर शपथ घेणार” असे अजित पवारांनी का म्हटले pic.twitter.com/pZ23fabPC8
ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा अजित पवारांना खोचक टोला
अजित पवार आणि त्यांची पत्नी आणि मुलगा पार्थ पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या तब्बल 1000 कोटींच्या मालमत्तेवरील जप्ती आयकर खात्याकडून उठवली जाणार आहे. यावरुन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजितदादांना टोला लगावला. अजित पवार यांनी लोकशाहीच्या बळटीकरणासाठी मोठ्या कष्टाने जो लढा दिला होता, त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झाले आहे. हा प्रवास यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आभार, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अजित पवारांच्या मालमत्ता जप्तीचं नेमकं प्रकरण काय?
अजित पवार यांच्याशी संबंधित मालमत्ता बेनामी संपत्ती कायद्याखाली जप्त करण्यात आली होती. यावरील जप्ती उठवण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाच्या निकालानुसार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्तांवरील जप्तीही उठवण्यात आली आहे. या मालमत्तांमध्ये स्पार्कलिंग सॉइल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्तांचा समावेश होता.
आणखी वाचा