Buldhana Crop Loss : बुलढाण्यात तीन तालुक्यात अतिवृष्टी, एक लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका संग्रामपुरात
Buldhana News : संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात अचानक ढगफुटी सदृश पाऊस बरसला आणि यामुळे मात्र अनेक शेतकऱ्यांचे होत्याचं नव्हतं झालं आहे.
Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एक लाख हेक्टर वरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परिसरात आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी अद्यापही अतिवृष्टीची शक्यता असल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शनिवारी सकाळी संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात अचानक ढगफुटी सदृश पाऊस बरसला आणि यामुळे मात्र अनेक शेतकऱ्यांचे होत्याचं नव्हतं झालं. परिसरातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत किंवा जमीन खरडून गेली आहे. यामुळे मात्र शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट उभे राहिलं आहे.
बुलढाण्यात तीन तालुक्यात अतिवृष्टी
जळगाव तालुक्यातील जामोद गावचे गजानन ढेनगाळे यांचे चार एकर शेतीतील कापसाचे पीक पूर्णपणे नेस्तनाबूत झालं आहे. शनिवारी सकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे यांच्या शेताची अक्षरक्ष: नदी झालेली आहे आणि शेती खरवडून गेलेली आहे. त्यामुळे चार एकर कापसाचे पीक पूर्णपणे निस्तेनाभूत झालं आहे. या शेतकऱ्याचे जवळपास चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान सध्या झालेला असून शेतीतील माती ही खरवडून गेल्यामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात कायमचं नुकसान झालं आहे.
एक लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान
संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यातील अनेक हेक्टरवरील पिके सध्या ही पाण्याखाली आहेत. तर, संग्रामपूर शहरातील अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. थोडक्यात, संग्रामपूर जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात हे नुकसानीचे दृश्य दिसत आहे. गावात असो किंवा शेतात सगळीकडे काही ना काही प्रमाणात प्रत्येक नागरिकांचे या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे.
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका संग्रामपुरात
अतिवृष्टीचा फटका सर्वात जास्त संग्रामपूर तालुक्याला बसला असून या तालुक्यात जवळपास 40 हजार हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालेलं आहे. प्रशासनाने या तिन्ही तालुक्यात पंचनामे सुरू केले असून खासदार प्रतापराव जाधव यांनी या परिसराचा आज दौरा केला आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत केल्या जाईल असे आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
कुठे शेतीचं नुकसान तर, कुठे मोडला संसार
बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं आहे तर, हजारो घरांची पडझड झालेली आहे मात्र राज्य शासनाचा एकही प्रतिनिधी या तिन्ही तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानंतर 24 तासातही पोहोचला नव्हता त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.
संबंधित इतर बातम्या :