Buldhana News: संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस; अनेक गावांना पुराचा वेढा , दोन्ही तालुक्याचा संपर्क तुटला
संग्रामपूर शहरात अक्षरशः चार ते पाच फूट पाणी असून जळगाव जामोद येथेही पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला आहे.
बुलढाणा: बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात आज सकाळपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. या दोन्ही तालुक्यात आणि सातपुडा पर्वतात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुक्यातील जवळपास 140 गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक मार्ग बंद पडले आहेत. दोन्ही तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेलं आहे. संग्रामपूर शहरात अक्षरशः चार ते पाच फूट पाणी असून जळगाव जामोद येथेही पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर रिमझिम पाऊस बरसत होता. मात्र सकाळ झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात पावसाने रौद्ररूप धारण केलं. सकाळपासून बरसात असलेल्या मुसळधार पावसाने या परिसरातील सर्वच नदी नाल्यांना मोठे पूर आले. तर अनेक गावात पाणी शिरल्याने नागरिकांची घरेही पाण्याखाली गेली संग्रामपूर तालुक्यातील बावनविर येथील नदीला आलेल्या पुरात जवळपास 100 घरात पाणी शिरलं तर एकलारा बानोदा येथील मदन ढगे नावाचे शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेले अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.
संग्रामपूर शहर व तालुक्यात भावनबीर वरवट बकाल वानखेड काथरगाव या गावांना पुराच्या पाण्याने वेढलेला असून संग्रामपूर शहरात सुद्धा पुराच्या पाण्याने रौद्ररूप धारण केलेला आहे. जवळपास तालुक्यातील अनेक गावाला पुराच्या पाण्याने भेटलेला आहे. त्यामुळे शेगाव संग्रामपूर जळगाव जामोद हा महामार्ग तर जळगाव जामोद नांदुरा हा दुसरा महामार्ग बंद पडल्याने या दोन्ही तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाचे संपर्क तुटलेला आहे.
40 ते 50 नागरिक हे पुराच्या पाण्यात अडकले
संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथे अनेक नागरिक हे पुराच्या पाण्याने वेडल्या गेल्याने अडकले आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्यांचे हेलिकॉप्टर द्वारे सुटका करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी एबीपी माझाला माहिती देताना म्हटले आहे की, काथरगाव येथील जवळपास 40 ते 50 नागरिक हे पुराच्या पाण्यात अडकले आहे आणि त्यांना एअरलिफ्ट काढण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत.
शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
एकंदरीत बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद या तालुक्याला आज पावसाचा रौद्ररूप बघायला मिळालं. या तालुक्यातील वृद्धांनी सांगितले की 1960 नंतर पहिल्यांदा इतका मोठा पाऊस बरसला आहे या दोन्ही तालुक्यात फक्त तीन तासात संपूर्ण तालुके जलमय झाले. तर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे नुकत्याच पेरलेल्या पिक हे पाण्याखाली असून अनेकांच्या शेती या वाहून गेल्या आहेत.