Buldhana News: आज राज्यातील 10 हजार समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचं 'कामबंद आंदोलन'
Buldhana News: आज राज्यातील 10 हजार समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचं 'कामबंद आंदोलन'. मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन करण्याचाही इशारा. बीडमध्येही एक दिवसाचा संप.
Community Medical Officer Strike: महाराष्ट्रातल्या (Maharashtra News) सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्यशासन दुर्लक्ष करत राहिल्यानं केल्यानं आज काम बंद आंदोलन पुकारलं आहे. तसेच, मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी (Community Medical Officer) म्हणून काम करणाऱ्या राज्यातील 10 हजारांच्या वर आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज कामबंद आंदोलन पुकारलं आहे. जय सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. यासंबंधी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर हे आरोग्य अधिकारी आज निदर्शनं करणार आहेत.
समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना अर्थात सीएचओ यांना शासकीय सेवेत कायम करून 'ब' वर्गाचा दर्जा देण्यात यावा, वेतन निश्चिती 36 हजार रुपये आणि कामावर आधारित वेतन 40 हजार रुपये करण्यात यावं, बदल्यांबाबत धोरण निश्चित करण्यात यावं यासह अशा अनेक मागण्यांसाठी आज हे आंदोलन करण्यात येत आहे.
समुदाय आरोग्य अधिकारी यांनी कोरोना काळात आपली जीवाची परवा न करता रुग्णांसाठी बहुमूल्य सेवा दिली आहे .या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार तयार नाही आणि त्यामुळे राज्यातील समुदाय आरोग्य अधिकारी आज 16 जानेवारी रोजी एक दिवसाचे काम बंद आंदोलन करत आहे. राज्यात जवळपास दहा हजार समुदाय आरोग्य अधिकारी गेल्या सहा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा देत आहे. मात्र त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याकडे शासनाचे दुर्लक्ष असून त्यांचे नेमकी परवड होत आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये असंतोष आहे, तर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सेवेत कायम करून 'ब' वर्ग अधिकार्याचा दर्जा द्यावा, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना निश्चित वेतन हे 36 हजारावरून चाळीस हजार करण्यात यावं, त्यासाठी निश्चित केलेले 23 इंडिकेटर्स रद्द करण्यात यावं. बदल्यांबाबतचं धोरण ठरवण्यात यावं, पती-पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजार, कुटुंबातील व्यक्तीच्या आजार, यांचा बदल्यांमध्ये विचार करण्यात यावा. अशा समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांची दखल सरकारनं न घेतल्यास 23 जानेवारीपासून राज्यातील सर्व दहा हजारावर समुदाय आरोग्य अधिकारी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याच राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.
आज समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे संपूर्ण राज्यात आणि सगळ्या संघटनांकडून काम बंद आंदोलन करण्यात आल आहे. या निमित्तानं बुलढाणा जिल्हा परिषदेसमोरसुद्धा निदर्शनं करण्यात येणार आहे. आपला हक्क मागत सरकारकडे योग्य मागण्यांबाबत अनेक वेळा संघटनेकडून पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला काम बंद आंदोलनाचा सहारा घ्यावा लागत असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. विशाल बाजड यांनी दिली आहे.
बीडमध्येही समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून एक दिवसाचा संप
बीडमध्ये समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारून जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं बीड जिल्ह्यातील सर्वच डॉक्टर यामध्ये सहभागी झाले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत काम करणाऱ्या या समुदाय अधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी आरोग्य सेवेमध्ये रुजू करण्यात यावं त्याचबरोबर वेतन वाढ आणि बोनस मिळावं यास इतर मागण्यासाठी या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आपला संप पुकारला आहे. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी ज्या मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. त्या जर 23 तारखेपर्यंत मान्य झाल्या नाहीत तर बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या डॉक्टरांनी प्रशासनाला दिला आहे.