(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Gaikwad : 'तर मी बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढवणार', शिंदे गटाच्या आमदाराचे भाजपला खुलं आव्हान
Loksabha Election : जर भाजपने बुलढाण्याची लोकसभेच्या जागेवर खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी नाही दिली तर ती जागा मी लढवेन आणि जिंकेनही असं आवाहन संजय गायकवाड यांनी दिलं.
बुलढाणा : भाजपकडून (BJP) बुलढाण्यात (Buldhana) लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election) सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये बुलढाण्यात जी लोकसभेची जागा आहे, ती चार नंबरवर दाखण्यात आली असून खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) निवडून येणार नसल्याचं म्हटलं. यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. 'जर ही जागा भाजपने घेतली तर मी या लोकसभेची निवडणूक लढवेन आणि जिंकेनही', असं आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी म्हटलं.
सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहतायत. त्यातच सध्या लोकसभा निवडणुकांचे सर्वेक्षण केले जात आहे. बुलढाण्यातील लोकसभेची जागा ही सध्या शिवेसनेच्या शिंदे गटाकडे आहे.खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलीये. पण सध्या बुलढाण्यात मात्र काहीसं वेगळचं चित्र पाहायला मिळतंय. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी यावर भाष्य करत भाजपला खुलं आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे.
संजय गायकवाडांनी नेमकं काय म्हटलं?
'बुलढाण्यातील लोकसभेची जागेची मागणी सध्या भाजपकडून होत असल्याचं म्हटलं जात आहे. सर्वेक्षणामध्ये ही जागा चार नंबवर दाखवल्याने ही जागा आम्हाला द्या असं भाजपचं म्हणण आहे. ही जागा शिंदे गटाकडे असल्यामुळे ती जागा निवडून येणार नाही, त्यामुळे ती जागा आम्ही लढवतो. पण शिवसेनेची लोकसभेची जागा देणार नाही, तिथे खासदार प्रतापराव जाधवच निवडून येतील. पण जर प्रतापराव जाधव जर निवडून येत नसतील तर आम्ही ही जागा लढायला तयार आहोत. माझा सर्वे करा, मग तुम्हाला समेजल की नक्की काय आहे ते. मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काही इच्छुक नाही, पण प्रतापराव जाधवांना उमेदवारी दिली नाही तर शिवसेनेचा जागा राखण्यासाठी मी तो निर्णय घेऊ शकतो', असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं.
राज्यातील सत्तासंघर्षानंतर लोकसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. सध्याच्या महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यामध्ये लोकसभेच्या जागेवरुन बरेच संभ्रम आणि वाद असल्याचं नेहमची म्हटलं जातं. पण तिन्ही पक्षाकडून हे दावे खोडून काढले जातात. पण आता संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा लोकसभेच्या जागावाटपावरुन महायुतीमध्ये खडाजंगी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.