(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Jodo Yatra : एक हजार वारकरी रिंगण सोहळा करुन राहुल गांधी यांचं बुलढाण्यात स्वागत करणार
Bharat Jodo Yatra : अकोला आणि बुलढाण्याच्या सीमेवरील जवळा वरखेड या गावातील जवळपास एक हजार वारकऱ्यांनी राहुल गांधींच्या स्वागताची तयारी केलेली आहे. विठ्ठलाच्या मूर्तीभोवती रिंगण सोहळा आयोजित करुन राहुल गांधी यांचं स्वागत केलं जाणार आहे.
Bharat Jodo Yatra : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचं (Bharat Jodo Yatra) अनोख्या पद्धतीने स्वागत होणार आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील जवळा वरखेड या गावातील आणि परिसरातील जवळपास एक हजार वारकऱ्यांनी राहुल गांधींच्या स्वागताची तयारी केलेली आहे. पदयात्रा मार्गाच्या बाजूच्या शेतामध्ये वीस फूट उंच विठ्ठलाची मूर्ती उभारुन त्या मूर्तीभोवती रिंगण सोहळा आयोजित करुन राहुल गांधी यांचं बुलढाणा जिल्ह्यात स्वागत करण्यात येणार आहे.
येत्या 18 तारखेला खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे येणार आहे. शेगाव-बाळापूर मार्गावरील जवळा-वरखेड गावाजवळील या मार्गावर विष्णुपंत हरिभाऊ कानडे या ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याच्या चार एकर शेतात 20 फूट उंच विठ्ठलाची मूर्ती उभारुन त्याभोवती एक हजार वारकरी रिंगण सोहळा करुन राहुल गांधी यांचं स्वागत करणार आहेत. यावेळी राहुल गांधी हे देखील वारकऱ्यांचा वेष परिधान करुन त्यांच्यासोबत पावलं टाकत रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या सोहळ्यासाठी परिसरातील वारकरी आणि काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते उत्साहित आहेत.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा विदर्भात दाखल
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाक्यावरुन पैनगंगा नदी ओलांडत राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. पुढचे पाच दिवशी ही यात्रा विदर्भातील वाशिम, अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यातून जाणार आहे. 7 सप्टेंबरला कन्याकुमारी इथून सुरु झालेल्या भारत जोडो यात्रेने 7 नोव्हेंबरला तेलंगणातून देगलूरमार्गे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात प्रवेश केला होता. आज बिरसा मुंडा जयंती आहे, त्यामुळे आदिवासी बांधव देखील मोठ्या संख्येने आज भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.
सूर्योदयाआधी पदयात्रेला सुरुवात
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आज नववा दिवस आहे. हिंगोली जिल्ह्यातील फळेगाव फाटा इथून राहुल गांधी यांची पदयात्रा सकाळी सव्वासहा वाजता सुरु झाली. सूर्योदयाआधी अंधुक प्रकाशात आज ही यात्रा सुरु झाली. यात्रा सुरु झाली तेव्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे आणि इतर नेते उपस्थित होते. सकाळी सहा वाजता शेकडोंचा जनसमुदाय या यात्रेत सहभागी झाला. सुरक्षेच्या दृष्टीने राहुल गांधी यांच्या यात्रेला अत्यंत मजबूत सुरक्षा घेरा आहे. त्या घेऱ्याच्या आत काँग्रेस नेत्यांना, पदाधिकाऱ्यांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यानंतर कनेरगाव फाटा मार्गे या यात्रेने विदर्भात प्रवेश केला.