'ॲक्सेस कंट्रोल्ड' समृद्धी महामार्गावर 'बियर बारचा ॲक्सेस'? महामार्गावर बियर, वाईन शॉपचे बोर्ड, प्रशासनाचं दुर्लक्ष?
Samruddhi Mahamarg: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ (Sindkhed Raja) अनेक ठिकाणी समृद्धी महामार्गालगत बियर आणि वाईन शॉप असल्याचं निदर्शनास आलं आहे.
Buldhana Samruddhi Mahamarg: बुलढाणा : सर्वात वेगवान महामार्ग अशी ओळख असणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) सर्रासपणे दारु विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आधीच सातत्यानं होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत असणारा महामार्ग आता दारूंच्या दुकानांमुळे चर्चेत आला आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ (Sindkhed Raja) अनेक ठिकाणी समृद्धी महामार्गालगत बियर आणि वाईन शॉप असल्याचं निदर्शनास आलं आहे. अनेकदा वाहनचालक मद्यप्राशन करुन महामार्गावर ट्रक चालवत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
मेहकरजवळील अनधिकृत स्टॉलवर बनावट दारू विक्री सर्रास सुरू आहे. त्यामुळे ट्रकचालक अनधिकृतपणे या एक्स्प्रेसवेवर थांबून मद्य विकत घेऊन याच ठिकाणी मद्यप्राशन करून ट्रक या चालवत असतात. यामुळे मात्र मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याआधीही 'एबीपी माझा'नं अनधिकृतपणे थांबा घेणाऱ्या ट्रक चालकांसंदर्भातली बातमी प्रसारित केली होती. मात्र, परिवहन विभाग, अबकारी कर विभाग आणि पोलीस विभाग थातुरमातुर कारवाई करून निघून जातात. मात्र, यामुळे मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण राहणार? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
'ॲक्सेस कंट्रोल्ड' म्हणून ख्याती आणि 120 किमी वेग मर्यादा असलेला समृद्धी महामार्ग हा या महामार्गावर होणाऱ्या अपघात आणि जीवितहानी मुळे नेहमी चर्चेत असतो. अनेकदा अती वेगानं वाहन चालवण्यानं तर कधी चालकाला झोप आल्यामुळे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता एक नवं आणि धक्कादायक कारण समोर येत आहे. या महामार्गालगत असलेल्या अधिकृत आणि अनधिकृत बियर, वाईन बारमुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
अनधिकृत स्टॉलवर बनावट दारू विक्री सर्रास सुरू
समृद्धी महामार्गालगत बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ महामार्गलगत बियर आणि वाईन बार आहेत. तर मेहकरजवळ अनधिकृत स्टॉलवर, अनधिकृत आणि बनावट दारू विक्री सर्रास सुरू आहे. त्यामुळे ट्रक चालक अनधिकृतपणे या मेगा सुपर एक्स्प्रेसवर थांबून मद्य विकत घेऊन तर कधी याच ठिकाणी मध्यप्राशन करून या महामार्गावरुन ट्रक चालवतात. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याआधीही 'एबीपी माझा'नं अनधिकृतपणे थांबा घेणाऱ्या ट्रक चालकांवर कारवाई करण्याची मागणी बातमीद्वारे केली होती. मात्र परिवहन विभाग, अबकारी कर विभाग आणि पोलीस विभाग थातुरमातुर कारवाई करून निघून जातात. मात्र, यामुळे मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण राहणार? हा प्रश्न सध्या तरी निरुत्तरीतच आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ज्या ठिकाणी खाजगी बसला आग लागून 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याच्या अगदी जवळ हे बियर बार असल्यानं अजूनही शंकांना वाव येतो. 'ॲक्सेस कंट्रोल्ड' आणि 120 किमी वेग मर्यादा असल्यानं प्रत्येक वाहन वेगानं जात असतं. मात्र, अशा अनधिकृत थांब्यांमुळे याआधी अनेकांचे जीव गेले आहेत. मात्र, ट्रक चालकांना दारू विकत घेण्यासाठी 'ॲक्सेस' मिळतोच कसा? तरीही प्रशासनाला जाग येत नाही हे विशेष.