Chitale Dairy : आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी चितळे डेअरीकडून पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांचे योगदान
Chitale Dairy : चितळे डेअरीनं राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात काही भागांत या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पशुधन व शेत-शिवाराच्या झालेल्या नुकसानातून आपत्तीग्रस्त शेतकरी व नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी चितळे डेअरीने पुढाकार घेतला असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. मुंबईत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीचा धनादेश चितळे डेअरीतर्फे सीनियर मॅनेजिंग पार्टनर श्रीपाद चितळे, विश्वास चितळे व मॅनेजिंग पार्टनर निखिल चितळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
चितळे डेअरी गेल्या 86 वर्षांपासून दुग्धव्यवसायासोबतच समाजकार्यातही सातत्याने अग्रस्थानी राहिली आहे. कोविडसारख्या जागतिक महामारी; तसेच पूरसारख्या स्थानिक आपत्तींमध्येही संस्थेने शेतकरी बांधवांसोबत कायम खंबीरपणे उभे राहून मदतीचा हात दिला आहे.
“शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. या वर्षी राज्याच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि पुनर्बांधणीसाठी हातभार लावणे ही आमची जबाबदारी आहे,” असे चितळे डेअरीचे मॅनेजिंग पार्टनर श्री. निखिल चितळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबई येथे 'मे. बी. जी. चितळे (चितळे डेअरी)'च्या वतीने श्रीपाद चितळे, विश्वास चितळे आणि निखिल चितळे यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये 1 कोटी रुपये देणगीचा धनादेश सुपूर्द केला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.


















